पर्ससीन मच्छिमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख “सकारात्मक” !
आमदार राजन साळवी यांच्या पुढाकारातून मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक
केंद्राच्या हद्दीत मासेमारीसाठी मत्स्यव्यवसाय विभाग केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मागविणार
कुणाल मांजरेकर
नवीन मासेमारी कायद्यात मत्स्यव्यवसायावर लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर पर्ससीनधारक मच्छिमारांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बेमुदत साखळी उपोषणे सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार डॉ. राजन साळवी यांच्या पुढाकारातून मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या दालनात गुरुवारी पर्ससीनधारक मच्छिमारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत आ. साळवी यांच्यासह उपस्थित मच्छिमारांनी आपले म्हणणे मत्सव्यवसाय मंत्र्यांसमोर मांडल्यानंतर ना. अस्लम शेख यांनी पर्ससीन मच्छीमारांच्या काही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पर्ससीनधारकांना केंद्राच्या हद्दीत मासेमारीस परवानगी देण्याबाबत राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग केंद्र सरकार कडून मार्गदर्शक सूचना मागवणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पर्ससीन धारक मच्छिमारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मागणीनुसार मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागणी संदर्भात गुरुवारी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाने केलेल्या पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्यामध्ये घातलेल्या अटी काही अंशी बदल होण्याच्या निर्णयाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांना निवेदन देऊन मच्छीमार बांधवांच्या समस्या व मागण्या निदर्शनास आणल्या. सदर मागण्यामधील महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छिमारी करून येणाऱ्या पर्ससीन बोटींना बंदरात ये-जा करायला व मासळी उतरायला सप्टेंबर ते मेपर्यंत परवानगी देऊन भारताच्या संविधानात दिलेले मुलभूत अधिकार अबाधित ठेवणेबाबतविनंती केली. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख मच्छीमार बांधवाच्या समस्या व मागण्याचा विचार करता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना मागवून निर्णय घेतला जाईल असे सूचित केले. या बैठकीस आमदार डॉ.राजन साळवी, सेक्रेटरी जगदीश गुप्ता, आयुक्त मत्स्यव्यवसाय अतुल पाटणे, OSD मंत्री युवराज चौगुले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे (online), अविनाश लाड, सुरेश धानू, इम्रान मुकादम, कृष्णनाथ तांडेल, अशोक सारंग व अन्य मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित होते.