प. पू. भालचंद्र गावडे महाराज यांचे देहावसान ; चुनवरे निवासस्थानी उद्या होणार समाधिस्त

वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; पिंगुळी- रायवाडी येथे अंत्यदर्शनासाठी भक्तांची रिघ 

मालवण : मालवण तालुक्यातील मसदे- चुनवरे येथील भालचंद्र तातू गावडे उर्फ भालचंद्र गावडे महाराज यांचे मंगळवारी पहाटे देहावसान झाले. अन्ननलिकेचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर पिंगुळी रायवाडी येथील एका भक्ताच्या रामलक्ष्मी निवासस्थानी उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी पहाटे वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी देह सोडला. भालचंद्र गावडे महाराजांचा मोठा भक्तगण असून महाराजांच्या अकाली निधनाने हा भक्तगण पोरका झाला. त्यांच्या देहावसनाची बातमी समजताच पिंगुळी रायवाडी येथे अंत्यदर्शनासाठी भक्तांची रीघ लागली. बुधवारी चुनवरे गावी महाराजांना समाधी दिली जाणार आहे.         

मसदे-चुनवरे गावातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या भालचंद्र महाराजाना जन्मापासून व्यंग होते. अवघ्या दोन वर्षाचे असताना कुणकेश्वर यात्रेला आईवडीलांसोबत गेले असताना ते कणकवलीतील प.पू.भालचंद्र महाराजांच्या सान्निध्यात आले. लहानपणी शारीरिक व्यंग असल्याने ते दुर्लक्षीत राहिले. लहानपणापासून अंगावर कपडे न घालता बाहेर घरात चुलीसमोर बाहेर उकिरड्यावर बसून असायचे. पाणी न पीता जास्त तिकट खाणे, लहान मुलाप्रमाणे जेवण भरवणे, दिवसातून चारपाच वेळा आंघोळ घालून घेणे, हा त्यांचा  नित्यक्रम असायचा. महाराजांच्या जन्मापासून घरात भरभराट झाली होती. मात्र वयाच्या ३५ वर्षानंतर गावातील अनेकांना महाराजांची अनुभूती यायला सुरवात झाली. त्यांच्या अनेक लिलया दिसून आल्यानंतर महाराजांमध्ये असलेल्या दैवीशक्तीचा प्रत्यय येवू लागला. त्यामुळे महाराजांची सेवा करण्यासाठी भक्तमंडळी येत असत. महाराजाना भजनाची आवड असल्याने भक्तगण सेवारुपी भजन करीत असत. त्यात महाराज तल्लीन होत असत. काही महिन्यापूर्वी भालचंद्र महाराजांची तब्येत बिघडल्याने औषध उपचारासाठी त्यांना पिंगुळी रायवाडी येथील नातेवाईक तसेच निस्सिम भक्त यांच्या रामलक्ष्मी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. येथे भक्तगण महाराजांची भक्तीभावे सेवा करीत असत. रोज भजने असायची. मात्र अन्ननलिकेच्या त्रासाने ग्रस्त महाराजांची तब्येत सोमवारी रात्री खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अखेर मंगळवारी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर भक्तमंडळींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. मंगळवारी दिवसभर महाराजांचा देह पिंगुळी रायवाडी येथे ठेवून बुधवारी सकाळी मसदे चुनवरे गावी त्यांच्या घरी पार्थीव आणून समाधिस्त होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!