आम्हाला गृहीत धरू नका ; काँग्रेसचा निर्णय स्थानिक स्तरावरच !

कुडाळ नगरपंचायत निकालानंतर काँग्रेसची भूमिका ; नगराध्यक्ष पदाची अपेक्षा

कुणाल मांजरेकर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपने ८ तर शिवसेनेने ७ जागांवर विजय मिळवला आहे. स्वबळावर या निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेसलाही दोन जागांवर यश आल्याने नगरपंचायतीतील सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात राहिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार यावर कुडाळ मधील सत्तेचे गणित अवलंबून राहिले आहे. दरम्यान, काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी नगरपंचायत आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, आमचा निर्णय स्थानिक स्तरावरच होणार असून असे सांगतानाच कुडाळमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपदासाठी जो पक्ष पाठिंबा देईल, त्यांच्यासोबत आम्ही जाणार असल्याचे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

अरविंद मोंडकर

कुडाळ नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. तर काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या नगरपंचायतीचे निकाल बुधवारी हाती आले आहेत. यामध्ये भाजपाने सर्वात मोठा पक्ष बनत १७ पैकी ८ जागांवर यश मिळविले असले तरी शिवसेनेने येथे जोरदार मुसंडी मारत ७ जागा ताब्यात घेतल्या आहेत. तर २ जागा काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या सत्तेच्या गणितात काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरला आहे. काँग्रेसने शिवसेना राष्ट्रवादीसोबत न जाता स्वबळावर निवडणूक लढवल्याने या ठिकाणी चमत्कार घडून काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला मिळेल, या आशेवर भाजपाचे कार्यकर्ते आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली असली तरीही काँग्रेसचे दोन्ही उमेदवार शिवसेनेसोबत राहतील, असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा उमेदवार तथा युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत आम्हाला कोणीही गृहीत धरू नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. नगरपंचायत मध्ये आमचे दोन उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची मते निर्णायक असल्याने या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला जो पक्ष संधी देईल, त्याच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!