पर्ससीनधारकांच्या उपोषणाला अमित सामंतांची भेट फक्त भूमिका समजावून घेण्यासाठी ; पाठिंब्यासाठी नव्हे !

राष्ट्रवादीवर टीका करताना ना. अजित पवारांबाबत कृतघ्नपणा दाखवू नका

राजकारण करणाऱ्या “त्या” युवा नेत्याला मच्छिमारांचा सल्ला

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण येथे सुरू असलेल्या पर्ससीन मच्छिमारांच्या साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी भेट दिली होती. या भेटीवर टीका करणाऱ्या एका पारंपरिक युवा नेत्याला पर्ससीनधारक मच्छीमारांनी सुनावले आहे. अमित सामंत हे सत्ताधारी राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून फक्त पर्ससीन धारकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आले होते. त्यांची भेट या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नव्हती. त्यामुळे या भेटीवरून राजकारण करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यापूर्वी पारंपारिक मच्छिमारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवा, असा सल्ला पर्ससीनधारक मच्छीमारांनी दिला आहे.

अमित सामंत यांनी मालवण येथील पर्ससीन मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला भेट दिली होती. यावरून एका मच्छिमार युवा नेत्याने अमित सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. यावरून पर्ससीन मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्या नेत्याने भूमिका जाणून घेण्यासाठी भेट देणे म्हणजे पाठींबा देणे असा चुकीचा अर्थ कोणी काढू नये. नव्या मच्छिमारी कायद्याला पाठिंबा देण्यापूर्वी या नेत्यांनी या कायद्याचा संपूर्णपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. हा कायदा केवळ पर्ससीन मच्छीमारांसाठी त्रासदायक नाही तर मच्छीमारी करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी तो चुकीचा आहे. या कायद्यात विविध प्रकारच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी लागू झाली तर येथील समुद्रात मासेमारी करणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे केवळ पर्ससीन मच्छिमारांवर या कायद्याचा परिणाम होण्याचा आनंद व्यक्त करू नका, असे अशोक सारंग म्हणाले. मालवणच्या समुद्रात मोरी मासा, गोब्रा मासा, वाघळी यांसारख्या माशाची मासेमारी केली जाते. नऊ इंचापेक्षा कमी आकाराचा बांगडा मारला जातो, सुरमय सारखा मासा दोन किलोच्या खाली पकडण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र त्याचीही मासेमारी केली जाते. त्यामुळे उद्या या कायद्याच्या आधारे मच्छीमारी व्यवसाय असून उध्वस्त होणार आहे. मुळात शासनाने हा कायदा जाहीर करताना इंग्रजीमध्ये जाहीर केला आहे. त्यामुळे त्याची सर्वसामान्यांना माहिती मिळालेली नाही. तरी हा कायदा मराठीमध्ये आणण्याची मागणी अशोक सारंग यांनी केली आहे. अमित सामंत हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून उपोषणा मागील कारणे जाणून घेण्यासाठी आले होते. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी अद्याप पर्यंत आमच्या उपोषणाला भेट दिलेली नाही, मात्र भविष्यात त्यांना देखील आमचे विचार पटतील, असा विश्वास व्यक्त करतानाच पारंपारिक मच्छीमारांसाठी आजवर अजित पवार यांनी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे गैरसमजातून अमित सामंत व राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणे चुकीचे असल्याचे पर्ससीन मच्छिमारांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!