एसटी चालकानेच केली बसवर दगडफेक ; चालक अटकेत

मालवणहून वेंगुर्लेकडे जाणाऱ्या बसवर दगडफेक ; चारजणांचे कृत्य

मालवण : मालवण आगारातून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या एसटी बसवर (क्र. एम. एच.०६ एस. ९५२१) या क्रमांकाच्या एसटीवर शुक्रवारी सागरी महामार्गावरील तेंडोली- आवेरे बागलाची राय या ठिकाणी चार जणांकडून दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसचालकाच्या डोक्याला इजा झाली असून बसचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, आरोपींमध्ये एका बसचालकाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेतोरे पालकरवाडी येथील एस. टी. चालक संदीप शशिकांत चिचकर (वय ४४) याला अटक केली आहे.

मालवण आगारातील एस टी चालक अनिल गणपत भोगवेकर यांनी निवती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आपण मालवण येथून वेंगुर्ले कडे एसटी बस घेऊन जात होतो. बागलाची राई दरम्यान गाडी आली असता रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या चालक चिचकर व अन्य अनोळखी तिघांनी गाडीच्या चालकाच्या बाजूने दगडफेक केली. यामध्ये खिडकीची काच फोडून आपल्या डोक्याला मार बसला आहे. यावेळी आपण गाडी थांबवली असता हे तेथून पळून जात होते. जातेवेळीही त्यांनी गाडीचे मागील दोन्ही काचेवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं. वि. कलम ३३६, ३३७, ४२७, ३४, सार्वजनिक संपत्ती नुकसान कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. व्ही. वारंग यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून वेतोरे येथील चिचकर यास ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी अधिक तपास श्री. वारंग करीत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!