मालवणात नगरपालिकेच्या वतीने साकारणार “मल्टीपर्पज हॉल”
सुमारे ७४ लाख रुपयांची निविदा मंजूर ; सर्वसोयीने युक्त असेल वातानुकूलित हॉल
३५० ची बैठक व्यवस्था ; ८ % कमी दरामुळे पालिकेचा ५.५० लाखांचा फायदा : महेश कांदळगावकर
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या वरील मजल्यावर सुमारे ३५० लोकांच्या सोयीचा मल्टीपर्पज वातानुकूलित हॉल बांधण्यात येणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून हे काम करण्यात येत असून यासाठी ७४ लाख किमतीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज पार्किंगसह होणारा हा हॉल बहुउपयोगी आणि शहराचं सौदर्य वाढविणारा आहे. लग्न समारंभ, कॉन्फरन्स, प्रदर्शन आदींसाठी या हॉलचा वापर करता येणार आहे.त्यामुळे न. प. च्या उत्पन्नताही भर पडणार आहे. या कामासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनातून निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.
आठ टक्के कमी दराची निविदा ; ५.५० लाखांचा फायदा
या कामासाठी ८ % कमी दराची निविदा आलेली आहे. त्यामूळे नगरपालिकेचा सुमारे साडेपाच लाखांचा फायदा झाला आहे. या शिल्लक रक्कमेतून याच ठिकाणी अन्य काही सुविधा निर्माण करता येणार असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.