सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय निर्बंधांसह सुरू ठेवा

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

मालवण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांची परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटन स्थळे आणि जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न करता निर्बंधांसह सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय कोरोना व्हायरस मुळे गेले दोन वर्षें बंदस्थितीतुन नोव्हेंबर पासून थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येत असताना ओमिक्रोन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. जे पूर्णपणे चुकीचे असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, वॉटरस्पोर्ट्स, जलक्रीडा व्यवसाय ५० % क्षमतेने कोविड निर्बंधाचे पालन करून सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत. सदर आदेशामध्ये बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या टूर गाईड, वाहन चालक, हॉटेल, रेस्ट्रॉरंट, रिक्षाचालक, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा व्यावसायिक, सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक, होमस्टे धारक याच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे तसेच गेल्या दोन वर्षातील बँक हप्ते व्याज लाईटबील, पाणीबिल, शासकीय कर यामध्ये स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही. आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहे. तरी या विषयी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय, सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक सेवा ५० % क्षमतेने कोव्हीड निर्बंधाचे पालन करून चालू ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास द्यावेत, अशी मागणी बाबा मोंडकर यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!