सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा २६५.१६ कोटींचा विकास आराखडा
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२२-२३ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता
२० जानेवारी होणाऱ्या राज्यस्तरीय नियोजन मंडळाच्या बैठकीत आराखडा होणार सादर
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजना 250 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना – 14 कोटी 78 लक्ष व आदिवासी उपयोजना 38 लक्ष 51 हजार अशा एकूण 265 कोटी 16 लक्ष 51 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. 20 जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रस्तावित आराखडा सादर केला जाणार असून प्रस्तावित वाढीव 137.15 कोटी निधीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते. त्याचबरोबर दूरदृष्य प्रणालीद्वारे खासदार विनायक राऊत, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील यांच्यासह समितीचे इतर सदस्य सहभागी झाले होते. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी स्वागत करून विषय वाचन केले. डिसेंबर 2021 अखेर जिल्हा वार्षिक योजना ( सर्वासाधारण ) प्राप्त 170 कोटी निधीमधून 42 कोटी 63 लक्ष 57 हजार खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजना प्रत्यक्ष प्राप्त निधी 14 कोटी 78 लक्ष पैकी 2 कोटी 90 लक्ष तर आदिवासी उपयोजना प्रत्यक्ष प्राप्त निधी 37 लक्ष 29 हजार पैकी 70 हजार असा एकूण 45 कोटी 54 लक्ष 31 हजार रुपये खर्च झालेला आहे. मंजूर तरतुदीशी खर्चाची टक्केवारी ही 24.60 टक्के इतकी आहे. जिल्हा परिषदेकडून समर्पित झालेला 43 कोटी निधी 22-23 मध्ये शासनाकडून दिला जाणार असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, 505 कोटीचा आराखडा शासनाकडे पाठवू. 15 दिवसात बैठक घेऊन सदस्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
सभेच्या सुरुवातील दिवंगत चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासह 14 लष्करी अधिकारी आणि जवान तसेच दिवंगत सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी आभार व्यक्त केले.