कोकणातही रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार….

वैभववाडी-नाधवडेत कोकणातील पहिली बैलगाडा शर्यत संपन्न

देवरुखचे समीर बने यांची बैलगाडी प्रथम ; बंड्या मांजरेकर मित्रमंडळाचे आयोजन

वैभववाडी : सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यानंतर कोकणातील पहिली बैलगाडा स्पर्धा वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे पार पडली. बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या आयोजनात पार पडलेल्या या बैलगाडा शर्यतीत देवरुख- संगमेश्वर येथील समीर बने यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने (ता. लांजा) आणि तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण (ता. संगमेश्वर) यांनी मिळवला आहे. या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी शासनाकडूनही या शर्यतींना हिरवा कंदील देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी नाधवडे येथे कोकणातील पहिली बैलगाडा स्पर्धा घेण्याचा मान बंड्या मांजरेकर मित्रमंडळाला मिळाला. ही स्पर्धा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरणही श्री. बगाटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रविण देसाई, तुळशीदास रावराणे, श्री. कानडे, बाळा जठार, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सरपंच श्रीम. कुडतरकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे व नाधवडेतील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रथम क्रमांक पटकावलेल्या समीर बने यांना रोख रुपये ११,१११/- व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या द्वारकानाथ माने यांना ७७७७/- व चषक देऊन गौरविण्यात आले. तर तृतीय क्रमांकप्राप्त राजाराम चव्हाण यांना ५५५५ व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ रोशन किरवे देवरुख, उत्कृष्ट चालक सिरील फर्नांडिस कुडाळ घावनळे, उत्कृष्ट जोडी बळीराम पांचाळ चुनागोळवण राजापूर यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेला हजारोंच्या संख्येने हौशी प्रेक्षक व नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच या स्पर्धेला महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य, पशु व ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासन व इतर सर्व प्रशासनाचे व प्रेक्षकांचे आयोजक बंड्या मांजरेकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!