… शासनाने तुरुंगात टाकले तरी मागे हटणार नाही ; पर्ससीनधारकांचा इशारा
जमावबंदी, संचारबंदी लागू केली असली तरी सनदशीर मार्गाने उपोषण सुरूच राहणार
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, आमच्यावरील न्याय हक्कांसाठी आम्ही हे उपोषण करीत आहोत. त्यामुळे शासनाने जरी आम्हाला तुरुंगात टाकले तरी चालेल, पण जोपर्यंत आमच्यावरील जाचक अटी, निर्बंध मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आमचे साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा पर्ससीन धारकांच्या वतीने मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी दिला आहे. आमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने सनदशीर मार्गाने आणि कोणालाही उपद्रव न करता लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकारांचा वापर करून आम्ही हे उपोषण सुरू ठेवले आहे. शासनानेही आमचा सहानुभूतीने विचार करून आमच्या मागण्यांची दखल घ्यावी. तसेच आमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशी विनंती श्री. तांडेल यांनी केली आहे.
राज्य शासनाने मच्छीमारी कायद्यात सुधारणा घडवून आणत १ जानेवारी ते ३१ मे पर्यंत पर्ससीन मासेमारीला महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मनाई केली आहे. तसेच पर्ससीन धारकांनी आणलेली मासळी राज्याच्या किनारपट्टीवर उतरविण्यास देखील बंदी घातली आहे. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करून या व्यवसायात उतरलेल्या मच्छीमारांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर असोसिएशनच्यावतीने १ जानेवारीपासून मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने आज मध्यरात्रीपासून राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री ९ ते ६ यावेळेत संचारबंदी लागू केली आहे. या नव्या आदेशामुळे पर्ससीन मच्छीमारांच्या उपोषणाबाबत प्रश्न निर्माण झाला असता पर्ससीन मच्छीमारांचे नेते कृष्णनाथ तांडेल यांनी या उपोषणाची पुढील भूमिका स्पष्ट केली.