आमदार नितेश राणेंना धक्का ; अटकपूर्व जामीन फेटाळला
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल
कुणाल मांजरेकर
शिवसैनिक संतोष परब यांच्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने झटका दिला आहे. या मारहाण प्रकरणी आ. नितेश राणे यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन फेटाळला असून यामुळे आ. राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना १८ डिसेंबर रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवलीत प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने ऍड. संग्राम देसाई यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर मंगळवार आणि बुधवारी सलग दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर याचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. हा निकाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी सायंकाळी दिला असून हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणे किंवा पोलिसांसमोर हजर होणे हे दोन पर्याय आमदार नितेश राणे यांच्या समोर शिल्लक राहिले आहेत.