आ. नितेश राणेंना अटकेचा धोका ; नारायण राणेंनी दिला “हा” इशारा

कुणाल मांजरेकर

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या पुणे येथील समर्थकाला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सायंकाळी तातडीने कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुडाचे राजकारण सुरू असून आमच्या कार्यकर्त्यांना नाहक अटक केली जात आहे. आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोटा सावंत यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली जात असून त्यांना या प्रकरणात अटक करण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र पोलीस प्रशासनाने सरकारचे ऐकून दडपशाही सुरू ठेवली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. केंद्रात आमची सत्ता आहे आणि मी केंद्रात मंत्री आहे, असा इशाराच नारायण राणे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे येथील स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी तातडीने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत आपणाला या प्रकरणात नाहक ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सायंकाळी उशिरा कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात आपली भूमिका मांडली. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, रणजित देसाई तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, जिल्हा बँक आणि चारही नगर पंचायतीचे निकाल भाजपच्या बाजूने असल्याचे निश्चित आहे. आमच्या बाजूने विजयाचा कौल मिळणार हे समजल्याने सत्तारुढ हतबल झाले असून त्यामुळेच सुडाचे राजकारण करून आमचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना अटक करण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. कणकवलीमध्ये एका सज्जन कार्यकर्त्याला कोणीतरी मारहाण केली. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली, तरीही आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात त्यांना अटक करण्याची शक्यता दिसून येत आहे. हे सुडाचे आणि आकसर्वचे राजकारण आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून सत्तेचा दुरुपयोग शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून केला जात आहे. पण सिंधुदुर्गातील जनता या दडपशाहीला जुमानणारी नाही. या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होईल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!