तारकर्लीकडे येणाऱ्या मिनीबसला अपघात ; १६ महिला बालंबाल बचावल्या
करूळ घाटातील दुर्घटना ; मिनीबस वर ट्रक पलटी
वैभववाडी : करूळ घाटात धोकादायक वळणावर मिनीबसवर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात मिनीबस मधील १६ महिला बालंबाल बचावल्या आहेत. अपघातानंतर दारुच्या नशेत असलेला ट्रक चालक घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळून गेला. या दुर्घटनेमुळे घाट मार्गातील वाहतूक सहा तास ठप्प झाली होती. अपघातातील दोन्ही वाहने रस्त्यात अडकून पडल्याने मार्ग बंद झाला होता. दोन्ही बाजूंने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास दोनशे अवजड वाहने घाटात अडकून पडली होती. पोलिस घटनास्थळी दाखल होत क्रेन च्या सहाय्याने अपघातातील वाहने बाजूला केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. पोलिसांनी ट्रक चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणेहुन तारकर्लीकडे मिनीबस (क्रमांक एमएच १२ – एचबी २२९५) करुळ घाट मार्गे पहाटे साडेतीनच्या सुमारास जात होती. दरम्यान पाठीमागून ऊसाचा भुसा घेऊन जाणा-या ट्रकचा (क्र. एमएच ०९-सीए – ११४१) टायर फुटल्याने ट्रक मिनीबस वर पलटी झाला. या अपघातात मिनीबस दरीत कोसळता कोसळता बचावली. तर अपघात घडवून आणणारा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेन च्या साह्याने घाटातील दोन्ही वाहने बाजूला करून पोलिसांनी हा मार्ग पूर्ववत केला.