सभापती, उपसभापतींच्या कारभाराची निलेश राणेंकडे तक्रार करणार

गटनेते सुनील घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया : भाजपा तालुकाध्यक्षांबाबतही नाराजी

मालवण पं. स. मध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराबाबत दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांच्या कारभाराची भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. लोकहीत व जनहिताचा नेहमीच आदर करणारे निलेश राणे याबाबत योग्य तो निर्णय घेतील. याची आम्हाला खात्री आहे, असे नमूद करतानाच पंचायत समितीच्या कारभाराबाबत भाजप तालुकाध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही अथवा एकत्रित बैठक तालुकाध्यक्ष यांच्याकडून झालेली नाही. त्यामुळे सुरू असलेले आरोप प्रत्यारोप त्यांना योग्य वाटत असतील तर याबाबत न बोललेले बरेझ अशा शब्दांत तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमचे नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली व भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३२ वर्षे आम्ही समाजकारण, राजकारणात आहोत. राणे साहेबांच्या माध्यमातून विकासकामे व जनतेची सेवा करत आहोत. राणे साहेबांच्या तालमीत राहून प्रसंगी अन्यायाविरुद्ध पेटून उठून न्याय मिळवणे, याची शिकवण आम्हाला आहे. त्यामुळे मालवण पंचायत समितीत मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराबाबत योग्य ती भूमिका दोन दिवसात जाहीर केली जाईल. ‘सभागृहात व सभागृहा बाहेर तयार’ अशी भाषा वापरणाऱ्या सभापती, उपसभापती यांच्या पंचायत समितीतील व बाहेरील कारभाराचा पंचनामाच आम्हाला करावाच लागेल, असा इशाराही श्री. घाडीगांवकर यांनी दिला आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती, उपसभापती करत असलेला मनमानी कारभार सदस्यांना अन्यायकारक ठरत आहे. गटनेते या नात्याने माझीही नाराजी असून अन्य सदस्यही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सभापतींनी राजकिय उंची तपासावी !

पंचायत समितीचे कार्यक्रम व मासिक सभेला अनुपस्थित राहून सदस्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मात्र याबाबत सर्व सदस्यांना एकत्रित करून चर्चेतून तोडगा काढण्या ऐवजी सभापती- उपसभापती पत्रकार परिषद घेऊन ‘डबलबारी’ करण्याची भाषा वापरत असतील तर या कारभाराला मनमानी या शब्दा पलीकडे जाऊन ‘अरेरावी’ कारभार म्हणणे योग्य ठरेल. तालुक्याचा विकास, जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी जनतेने निवडून दिले असताना ‘सभागृहात व बाहेर डबलबारी करू’ ही सभापती, उपसभापती यांची भाषा अशोभनीय व जनतेचा अनादर करणारी आहे. सभापतीनी अशी भाषा वापरताना आपली राजकीय उंची तपासावी, असा सल्ला घाडीगांवकर यांनी दिला आहे.

सभापती, उपसभापती यांनी सर्वाना सोबत घेऊन पुढे जावे, आपल्या एकसंघ कारभाराने जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रमाणे आदर्श निर्माण करावा. राणेसाहेबाना अपेक्षित असे काम करावे. मात्र हे न करता कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता कारभार हाकण्याचा मनमानीपणा त्यांच्या कडून सुरू आहे. त्यामुळे सदस्यांवर अन्याय होत असून मतदारसंघाच्या विकासाला खीळ बसत आहे. म्हणूनच अन्याय झालेल्या सदस्यांचा आवाज बनून गटतेने या नात्याने लोकशाही मार्गाने लोकहिताची भूमिका मी घेत आहे. आम्हाला सर्वाना सोबत घेऊन जनतेची सेवा करायची आहे. भाजप नेते प्रदेश सचिव निलेश राणे याबाबत योग्य तो निर्णय नक्की घेतील. याचा आम्हाला विश्वास आहे, असेही सुनील घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!