खुशाल व्हीप बजावा, राजकारण माझा व्यवसाय नाही !

कमलाकर गावडे यांचे सुनील घाडीगांवकर यांना प्रत्युत्तर

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समिती मधील अंतर्गत राजकारण ढवळून निघाले आहे. कोणत्याही गटातटाच्या राजकारणाशी माझा संबंध नाही, असे वक्तव्य करणाऱ्या पं. स. सदस्य कमलाकर गावडे यांच्यावर गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी टीका करताना शासकीय नोंदीनुसार तुमच्या गटाचा गटनेता मीच आहे, आणि वेळ पडल्यास पुढील बैठकीत व्हीप बजावण्याचा अधिकार वापरू शकतो, असे म्हटले होते. त्यावर कमलाकर गावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शासकीय नोंदीनुसार तुम्ही गटनेते आहात, हे मला मान्य आहे. पण मी दोन वर्षांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला असून त्यावेळी पद जाण्याची भीती बाळगली नाही. त्यामुळे आता दोन महिन्यांसाठी पदाची लालसा मी बाळगणार नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नाही, त्यामुळे पद गेले तरी बेहत्तर… आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माझे सामाजिक कार्य सुरूच राहील, असे म्हटले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. गावडे यांनी म्हटले आहे की, सुनील घाडीगांवकर हे माझ्या प्रमाणेच काँग्रेस मधून निवडून आले आहेत. त्यामुळे व्हीप बजवायचा असेल तर त्यांनी स्वतःसह सर्व सदस्यांना बजावावा. पंचायत समिती मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना दुसऱ्यावर टीका टिपण्णी करणे, आवाज चढवून बोलण्याने कोणी मोठा होत नाही. तर शांतपणे आणि संयमाने अभ्यासपूर्वक प्रशासनाकडून स्वतःच्या मतदार संघातील कामे करून घ्यावी लागतात, या मताचा मी आहे. याला घाडीगांवकर बालिशपणा म्हणत असतील तर त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या पक्षीय राजकारणामध्ये आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीना ओढू नका, असे सांगून मी दोन वर्षांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळी पद जाण्याचा विचार केला नाही. मग आता दोन महिन्यासाठी पद जाईल, ही भीती कशासाठी बाळगू ? असा सवाल कमलाकर गावडे यांनी केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!