मालवण पं. स. मध्ये मानापमान नाट्य ; मासिक सभेवर सदस्यांचा अघोषित बहिष्कार !

केवळ ४ सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीचे सोपस्कार पूर्ण

आम्ही ८ सदस्य जाणीवपूर्वक अनुपस्थित : सुनील घाडीगांवकर यांची प्रतिक्रिया

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत सदस्यांमधील अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य अनुभवास आले. या सभेला १२ पैकी केवळ ४ सदस्य उपस्थित राहिले. त्यामुळे पंचायत समिती अधिनियमानुसार कोरम पूर्ण करून सभेचे सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यामुळे उर्वरित आठ सदस्यांनी पंचायत समिती सभेवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, या संदर्भात पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही आठ सदस्यांनी जाणीवपूर्वक बैठकीस अनुपस्थित राहण्याचे टाळल्याचे त्यांनी सांगून सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभाराला आम्ही कंटाळलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचेही श्री. घाडीगावकर यांनी म्हटले आहे.

मालवण पंचायत समितीमध्ये सदस्यांमध्ये अंतर्गत वाद विवाद वाढल्याचे चित्र अलीकडे सातत्याने दिसून येत आहे. पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर अलीकडे पंचायत समितीच्या अनेक कार्यक्रमापासून काहीसे लांब असल्याचे दिसून येत असून या पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळी ११ वाजता ही सभा पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेला सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांच्यासह सागरिका लाड आणि मनीषा वराडकर हे चार सदस्य उपस्थित होते. अर्धातास उर्वरित सदस्यांची प्रतीक्षा करण्यात आली. सभापतींनी काही सदस्याना फोन करून सभेची आठवण करून दिली. मात्र यानंतरही कोणीही सदस्य सभेस उपस्थित न राहिल्याने गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी पंचायत समिती अधिनियमाचे पुस्तक आणून किमान चार सदस्यांच्या उपस्थितीत सभा सुरू करता येत असल्याने नियमानुसार सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यानंतर केवळ २० ते २५ मिनिटात सभेचे कामकाज चालवून सभा आटोपती घेण्यात आली.

वैयक्तिक कामामुळे सदस्य अनुपस्थित : सभापती

या सभेनंतर सभापती अजिंक्य पाताडे यांनी सभेतील कमी उपस्थिती बाबत माहिती दिली. कोणीही सदस्य नाराज नसून दोन सदस्य मुंबईला असल्याने आज येऊ शकले नाहीत. तर काहींची अन्य कामे असल्याने ते आज उपस्थित नसल्याचे सभापतींनी सांगितले.

आम्ही ८ सदस्य जाणीवपूर्वक अनुपस्थित : सुनील घाडीगांवकर

पंचायत समितीच्या आजच्या सभेला आम्ही ८ सदस्य जाणीवपूर्वक अनुपस्थित असल्याची प्रतिक्रिया गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी दिली आहे. सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी आम्हाला विश्वासात न घेता स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतात. आम्हाला आठही सदस्यांना विचारात घेत नाहीत. तर प्रशासन देखील स्वतःची मनमानी करीत असून या बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सुनील घाडीगांवकर यांनी सांगितले. आम्हा ८ सदस्यांशिवाय ४ सदस्यांच्या उपस्थितीत ते सभा चालवत असतील तर आमचे काही म्हणणे नाही. मात्र यापुढे पंचायत समितीच्या प्रत्येक सभेला आम्ही ८ जण उपस्थित राहून आमच्या मर्जीप्रमाणे बहुमताच्या जोरावर ठराव घेणार आहोत. आमचे राजकीय पक्ष भिन्न असले तरी सभागृहात आम्ही आठजण एका विचाराचे असू, असेही सुनिल घाडीगांवकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!