हरवलेल्या आजोबांची अखेर कुटुंबियांशी झाली गाठभेट !
भाई मांजरेकर यांच्या सामाजिक जाणिवेचं होतंय कौतुक
कुणाल मांजरेकर
मालवण : कुटुंबा समवेत मालवणात फिरायला आलेले आजोबा विस्मृतीच्या आजारामुळे कुटुंबापासून दुरावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वायरी फाटकशाळे नजीक या आजोबांची गाठभेट येथील सामजिक कार्यकर्ते भाई मांजरेकर यांच्याशी झाल्यानंतर श्री. मांजरेकर यांनी त्यांना स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून तासाभराच्या शोधकार्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्यामुळे या आजोबांची पुन्हा एकदा कुटुंबियांशी भेट झाली. भाई मांजरेकर यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे येथील नानासिंग हे कुटुंबा समवेत पर्यटनासाठी मालवण शहरात आले होते. दांडी येथील एका बीच रिसॉर्ट वर त्यांनी मुक्काम केला आहे. त्यांना विस्मरणाचा आजार आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते मॅचेस आणण्यासाठी म्हणून बाजूला आले. मॅचेस शोधता शोधता ते कुटुंबापासून दुरावले. त्यानंतर त्यांनी आपल्या हॉटेलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण नक्की कुठे थांबलो आहोत, याची त्यांना आठवण होत नव्हती. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ते वायरी टिकम शाळेनजीक आले असता याठिकाणी भाई मांजरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांची गाठभेट झाली. त्यावेळी आपण कुटुंबापासून हरवलो असून आपण कुठल्या हॉटेल मध्ये आहोत, हे माहीत नसल्याचे ते म्हणाले. त्यावेळी
भाई मांजरेकर यांनी त्यांना स्वतःच्या मोटरसायकलवर बसवून शहारात संपूर्ण फिरवले. किनारपट्टी वरील काही हॉटेल मध्ये जाऊन त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही करून त्यांचा शोध लागत नसल्याने अखेर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत त्यांचे कुटुंबीय देखील त्यांचा शोध घेत होते. ते टिकम शाळेकडे आले असता भाई मांजरेकर शोध घेत असलेले कुटुंब हेच असल्याचे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यावेळी भाई मांजरेकर यांना फोन करून ही माहिती देण्यात आली. त्यानंतर या आजोबांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. भाई मांजरेकर यांनी सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.