सुनील घाडीगांवकरांचा पाठपुरावा : हेदूळ ते ओवळीये धनगरवाडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास !

दगड- माती टाकून रस्ता अडवणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकाला दणका ; अतिक्रमण जेसीबीने हटवले

जि. प. अध्यक्षांच्या आदेशानंतर जि. प. बांधकाम विभागाकडून कार्यवाही

जिल्हाधिकाऱ्यांनी कालच चिरेखाणीचा परवानाही केला होता रद्द

कुणाल मांजरेकर

मालवण : सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या हेदुळ ते ओवळीये धनगरवाडी रस्त्यावर अतिक्रमण करून दगड -धोंड्याच्या सहाय्याने हा रस्ता अडवणाऱ्या चिरेखाण व्यावसायिकाला जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी या चिरेखाणीचा परवाना रद्द केल्यानंतर आज जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी या प्रकरणी जि. प. बांधकाम विभागाची बैठक घेऊन तातडीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुपारी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवून हा रस्ता पूर्ववत वाहतुकीला सुरळीत करण्यात आला. मालवण पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला. त्याबद्दल ग्रामस्थांनी सुनील घाडीगांवकर यांच्यासह जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, आमदार वैभव नाईक, जि. प. चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मंगळवारी दुपारी प्रशासनाने जेसीबी घेऊन या डोंगराळ भागात जात अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर, जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, हेदुळ सरपंच नंददीपक गावडे, ओवळीये सरपंच अंबाजी सावंत, उपसरपंच सत्यविजय गावकर, बांधकाम विभाग उपअभियंता सावर्डेकर, यासह ग्रामस्थ समीर सावंत नंदू आंगणे यासह अन्य अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

येथील चिरेखाण व्यावसायिकाने आठ ते दहा दिवसांपूर्वी हा रस्ता दगड – माती टाकून अडवला होता. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी सदरील व्यावसायिकाला विनंती करून हे अतिक्रमण स्वतःहून बाजूला करण्याची मागणी केली. मात्र व्यावसायिक स्वतःच्या अडेलटट्टू भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे ग्रामस्थांनी पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांचे लक्ष वेधले. यावेळी श्री. घाडीगांवकर, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी याप्रश्नी प्रशासनाकडे आक्रमक पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची पाहणी करून या रस्ता मार्गावर असलेल्या चिरेखाणींचा परवाना रद्द केला. तसेच ग्रामस्थांना रस्ता पूर्ववत करून देण्याचे आदेश बांधकाम विभागास दिले. जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी सोमवारी संबंधित विभागाची बैठक घेत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशासनाने मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही केली आहे. सर्व प्रक्रियेत जि. प अध्यक्षा संजना सावंत तसेच आमदार वैभव नाईक यांनीही सहकार्य केल्याचे जि. प. चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, हेदुळ सरपंच नंददीपक गावडे यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!