वैभव नाईक कलियुगातील श्रीकृष्ण ; राजकिय वधाच्या भीतीने “कंसरुपी” निलेश राणे सैरभैर !
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची टीका ; वैभव नाईकां विरोधातील पुरावे सादर करण्याचे आव्हान
कुणाल मांजरेकर
मालवण : निलेश राणे असो अथवा केंद्रीयमंत्री नारायण राणे, या दोघांना शिवसेनेने दोन- दोन वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे. हेच शल्य राणे कुटुंबियांना असून राणे कुटुंबीयांच्या पराभवाचे शिलेदार असलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. निलेश राणे यांची “भाषाशैली” सर्वश्रुत असून यामुळेच त्यांच्या नावासमोर “माजी खासदार” ही बिरुदावली जनातेनेच लावली आहे. वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांना मदत केली, हा आरोप हास्यास्पद असून हिंमत असेल तर या संदर्भातील पुरावे निलेश राणे यांनी सादर करून “दूध का दूध पानी का पानी” करून दाखवावे. वैभव नाईक “कलियुगातील श्रीकृष्ण” असून आगामी निवडणुकीत त्यांच्या हातून “राजकीय वध” होण्याच्या भीतीने निलेश राणे सैरभैर झाल्याची जहरी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, किसन मांजरेकर, संमेश परब, सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अमेय देसाई यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक मतदार संघातील घराघरात पोहोचले आहेत. आमदार कसा असावा, मतदार संघात त्याचा संपर्क कसा असावा, याचे अनुकरण जिल्ह्यात अनेक जण आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाहून करतात. जनता आणि कार्यकर्त्यांशी विनम्रपणे वागताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच जनतेच्या हक्कासाठी सत्तेत राहूनही रस्त्यावर उतरण्याची धमक आजपर्यंत अनेक वेळा वैभव नाईक यांनी दाखवली आहे. त्यांच्यासारख्या आमदाराचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे. लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झालेले निलेश राणे जनतेतून दोन वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. केवळ स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ते अशाप्रकारची बेताल वक्तव्य करत असून त्यांच्या वक्तव्याकडे खासदार विनायक राऊत असो अथवा आमदार वैभव नाईक ढुंकूनही पाहात नाहीत.
निलेश राणे यांची भाषाशैली, त्यांचा सुसंस्कृतपणा मतदारांना माहीत आहे. त्यामुळेच मतदारांनी दोन वेळा त्यांना घरात बसवले. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची खात्री असल्याने त्यांच्यावर निलेश राणे आरोप करत आहेत. राणेंच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या गोटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व नगरपालिका, नगरपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असून त्यानंतर स्वतःला बसायला जागा शोधण्याची वेळ निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर येणार आहे. वैभव नाईक यांच्यावर गद्दारीचा आरोप करण्यापूर्वी त्यांच्या विरोधातील पुरावे हिम्मत असेल तर निलेश राणे यांनी सादर करावेत, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी दिले आहे.