निलेश राणेंनी फुंकलं मालवण नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग !
“गुलाल आपलाच उडाला पाहिजे, फटाके आपलेच वाजले पाहिजेत” ; निलेश राणेंचं आवाहन
सुदेश आचरेकर, दीपक पाटकरांसह पदाधिकाऱ्यांना निवडणूकीतील निर्णयाचे सर्वाधिकार
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शहरातील गुरुवारी कार्यकर्ता सभेत आगामी नगरपरिषद निवडणूकीचं रणशिंग फुंकलं. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांना नगरपरिषद निवडणूकीतील निर्णयाचे सर्वाधिकार देत तुम्ही घ्याल, तो निर्णय मला मान्य असेल, काहीही झाले तरी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
भाजप कार्यालयातील कार्यकर्ता सभेत निलेश राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जनतेला आता शिवसेना नकोय. संपूर्ण महाराष्ट्रात हे वातावरण आहे. मालवणात नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतंही काम झालेलं नाही. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी त्याची पोलखोल केली आहे. त्यामुळे आता त्यांना करण्या सारखं काहीही नाही. आता ते फक्त येऊन खोटं बोलणार. कुठलं तरी पत्रक दाखवणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २२ दिवसांनंतर आज रुग्णालयातून घरी आले. आता त्यांना मंत्रालयात जाण्यासाठी अजून २२ ते २५ दिवस लागतील, तोपर्यंत मालवणात नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली असेल, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी जिल्हा बँक निवडणूक जिंकण्यासाठी एकजुटीने कामाला लागा, आपल्या तालुक्यातील तिन्ही उमेदवार विजयी झाले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले.