कट्टा येथील रक्तदान शिबिरात २२१ जणांचे रेकॉर्डब्रेक रक्तदान
कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजन
कुणाल मांजरेकर
मालवण : सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप, जी एच फिटनेस कट्टा आणि आभाळमाया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डी. बी. ढोलम यांच्या कट्टा कावळेवाडी येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल २२१ जणांनी रेकॉर्डब्रेक रक्तदान केले. यामध्ये १०० हून अधिक नवीन रक्तदात्यांचा समावेश होता.
वराड कुसरवे रक्तदाते ग्रुपच्या वतीने १९ जून २०२० पासून आयोजित केलेले हे पाचवे रक्तदान शिबिर आहे. नवनवीन रक्तदात्याना रक्तदानासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हा ग्रुप कार्यरत आहे. सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवारी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला शासकीय ब्लड बँक ओरोस आणि एसएसपीएम मेडिकल कॉलेज पडवे यांच्या टीमचे सहकार्य मिळाले.