सागरी किनारपट्टी सुरक्षिततेसाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंचे महत्वाचे पाऊल

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य 

मुंबई : राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर  मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे क्यूआर कोडेड आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चंड शिपींग ॲक्ट 1958 च्या 435(एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारित 2021) मधील कलम 6(4) नुसार देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरुपी दिसेल असे रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील. याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981(सुधारीत 2021) अंतर्गत मासेमारी परवाना अटी – शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त श्री.तावडे यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3979

Leave a Reply

error: Content is protected !!