पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या सुदेश आचरेकरांना आता राणेंची कुटुंबप्रमुख म्हणून आठवण !

स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी आमदारांना फोन लावताना कुटुंबप्रमुखांची आठवण होत नाही का ?

शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतला सुदेश आचरेकर यांचा समाचार

कुणाल मांजरेकर

मालवण : सुदेश आचरेकर यांनी “राणे” नावाचा वापर केवळ स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी केला आहे. गरज संपल्यानंतर व येणाऱ्या काळाची चाहूल लागल्याने कधी अपक्ष उभे राहून तर कधी पडद्यामागे विरोधकांशी हातमिळवणी करून ज्यांनी “राणेंना” धोका दिला, तेच आज “राणे आमचे कुटुंबप्रमुख आहेत” असे सांगत लोकांना भुलवत आहेत. जेव्हा यांची कामे अडतात, तेव्हा हेच लोक आमदारांना स्वतःच्या कामांसाठी फोन लावतात. तेव्हा त्यांना कुटुंबप्रमुख आठवत नाहीत का ? असा सवाल शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला
आहे.

भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत नारायण राणे आमचे कुटुंबप्रमुख आहेत, त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, असे म्हटले होते. या वक्तव्यावरून शहरप्रमुख बाबी जोगी यांनी सुदेश आचरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. श्री. जोगी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुदेश आचरेकर या व्यक्तीला जिल्ह्यात नावारूपास आणले तेच मुळी नारायण राणे यांनी. आचरेकर यांनी आजवर जेवढी पदे उपभोगली, ती सगळी फक्त एका कुटुंबाची चाकरी केल्यामुळेच. बाकी त्यांच्या विषयी जनमत किती आहे, हे वेळोवेळी मालवणातील सामान्य जनतेने दाखवून दिलेच आहे. सुदेश आचरेकर यांना राणे कुटुंबीय पूर्णपणे ओळखून आहेत व सरते शेवटी हे त्यांना ही उमगले आहे की ही व्यक्ती आता आपल्या काही कामाची राहिली नाहीय. म्हणूनच प्रत्येक बाबतीत त्यांना डावलले जात आहे. याचमुळे वैफल्यग्रस्त झालेले आचरेकर प्रेस घेऊन स्वतः राणेंनी केलेले दावे खोडून काढताना आपण पाहत आहोत. शिवसेनेने नेहमीच हे सांगितले होते की बाळासाहेबांनी राणेंची उपद्रवमूल्ये ओळखून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, परंतु राणे स्वतः मात्र हा आरोप नाकारत आले आहेत. मी स्वतः पक्ष सोडला असे सांगत आले आहेत. परंतु कालच्या प्रेस मध्ये आचरेकर यांनी स्वतः कबूल केले की राणेंना बाळासाहेबांनी पक्षातून काढून टाकले होते. असो, सत्य परेशान हो सकता हैं , पराजित नहीं ! असेच म्हणावे लागेल.

दैवज्ञ भवन येथे जाहीर कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांची जाहीर स्तुती करणारे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हेच होते. मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी काय विकास केला आहे, ते तुम्हाला सुध्दा माहीती आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत ते तुम्हाला सुध्दा दिसेल, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.

केवळ नगराध्यक्ष पदाचे तिकीट नाकारले म्हणून आपल्याच कुटुंबप्रमुखांविरोधात “अपक्ष” निवडणूक कोणी लढवली हे मालवणातील जनता विसरली नाहीय. मनात राग ठेऊन वेळोवेळी राणे कुटुंबियांच्या विरोधात मालवणमध्ये कुणी काम केले व त्यामागे काय अर्थकारण होते हेही मालवणवासीयांना ठाऊक आहेच. वेळ आणि काळ बघून आपले कुटुंबप्रमुख बदलणारे फक्त आपल्या जुन्या मालकाला खुश करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत आहेत हे न समाजण्याइतकी मालवणची जनता दुधखुळी नक्कीच नाहीय.

बाकी तुमच्या कुटुंबात लुडबुड करण्याची आम्हाला मुळीच हौस नाही, जे चाललंय ते असेच चालत राहो व तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर राणे कुटुंबीयांचा प्रत्येक निवडणुकीत “कार्यक्रम” होत राहो हीच आमची मनोकामना. कारण राणे साहेब एक बोलतात आणि त्यांचेच कार्यकर्ते त्यांना खोटे पाडतात हे आता सर्वांना माहीत आहेच. परंतु त्याचबरोबर अशीच मुक्ताफळे आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये राणे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित असताना उधळावीत, ही सदिच्छा. त्यासाठी व्यासपीठावर आपल्यासाठी एक खुर्ची राखून ठेवावी असे मी राणेंच्या इतर निष्ठावान समर्थकांना आवाहन करतो, असा टोला बाबी जोगी यांनी लगावला आहे.

आचरेकरांची निष्ठा येत्या निवडणूकीत तिकीट वाटपानंतर दिसेल

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यानी कोविड काळ असूनही आणि तौक्ते वादळाचे संकट असूनही मालवणच्या विकासाची कामे केली आहेत. आणि जनता त्याची पोहोच पावती पण देत आहे. पण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील स्वीमिंग पुल, बैडमिंटन हॉल याला विरोध करुन मालवणच्या क्रीड़ापटुचे नुकसान कोणी केले, त्यांचे मूल्यमापनही जनता नक्कीच करेल. स्वतः च्या प्रभागातील ५०० मीटरचा रस्ता गेली पाच वर्षे न केलेल्यानी आमदार वैभव नाईक यांच्यावर तोंडसुख घेवु नये, असे सांगून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित तिकीट मिळवण्यासाठी राणे यांची मर्जी संपादन करण्याचा केविलवाणा प्रयत्न आचरेकर करत आहेत. त्यांची ही निष्ठा येणाऱ्या निवडणुकीत तिकिट वाटपानंतर किती राहते हे जनतेला आणि राणे कुटुंबियांनाही दिसेलच, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!