सिंधुदुर्गात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत चार दिवस विशेष मोहीम

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग यांच्याकडील २० ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळापत्रकाप्रमाणे विशेष मोहिमांचा कालावधी उद्या शनिवार दि. १३ नोव्हेंबर, रविवार दि.१४ नोव्हेंबर, शनिवार दि. २७ नोव्हेंबर आणि रविवार दिनांक २८ नोव्हेंबर हा आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज दिली.

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक १ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, दावे व हरकती निकालात काढणे २० डिसेंबर आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे ५ जानेवारी २०२२ असा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दि. १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे योग्य तो फॉर्म- नमुना नोंदविण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. १) फॉर्म- नमूना नं. ६ –नव्याने मतदार नोंदणी करणे. २) फॉर्म- नमुना नं. ७ मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदार यांचे मतदार यादीतील नाव वगळणे. ३)फॉर्म- नमुना नं. ८ मतदार यादीतील नावांची किंवा तपशीलाची दुरुस्ती करण्याकरिता. ४) फॉर्म. नमुना नं. ८अ- मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता. दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने नाव नोंदणी करण्याचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग, यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती / कायमस्वरुपी स्थानात बदल/ मयत मतदार असे अर्ज संबंधित तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येतील. ग्राम विकास विभागाच्या दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!