राजकीय दावे फोल ! चिपी विमानतळ सर्वसामान्यांना महागच !
विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात एकमेकांची उणीदुणी काढणारे नेते लक्ष देणार का ?
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासीयांचं विमान प्रवासाचं स्वप्न साकार व्हावं, यासाठी चिपी विमानतळ सुरू करण्यात आलं. हे विमानतळ सुरू करताना सर्वच राजकिय पक्षांच्या बोलबच्चन पुढाऱ्यांनी अनेक गमजा मारल्यात. मात्र महिन्याभरातच चिपी विमानतळाचं वास्तव स्पष्ट झालं आहे. उडान योजनेत हे विमानतळ समाविष्ट केल्याने सर्वसामान्य सिंधुदुर्गकर आणि चाकरमान्यांना अडीच ते तीन हजार रुपयात मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवास करता येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अवघ्या एका महिन्यात विमानाचा तिकीटदर २५०० वरून १२ हजारावर पोहोचला आहे. येत्या काही काळात हा तिकिटदर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात विमानतळाच्या श्रेयवादावरून शिवसेना – भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी येथील राजकीय संस्कृतीचे दर्शन अवघ्या जगाला घडविले. हे लोकप्रतिनिधी विमानतळाचा तिकीट दर आटोक्यात आणून सर्वसामान्य सिंधुदुर्ग वासियांचे विमानाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच देशी-विदेशी पर्यटक सिंधुदुर्गात यावेत आणि त्याच बरोबर सिंधुदुर्गवासियांचे विमानात बसण्याचे स्वप्न साकार व्हावे, या उद्देशाने विमानतळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. नारायण राणे राज्यात उद्योग मंत्री असताना या विमानतळाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. तर अलीकडेच ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमातून एकमेकांची उणीदुणी काढून येथील राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले. विमानतळाच्या श्रेयवादावरून या दोन्ही नेत्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मात्र विमानतळ विकासक असलेल्या आयआरबी कंपनीवर नियंत्रण ठेवणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य झालेले नाहीत.
महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला २५०० रुपये द्यावे लागायचे, त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल १२ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे विमान प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासियांची घोर निराशा झाली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचं प्रत्येक कोकणवासियाचं स्वप्न होतं. अगदी अडीज तीन हजार खर्च करुन आपण गावी जाऊ, असं चाकरमानी मोठ्या अभिमानाने सांगत होते. पण आता तीन हजारांचं तिकीट तब्बल १२ हजार रुपयांना घ्यावं लागणार आहे. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीट अडीच हजार रुपयांवरून १२ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सिंधुदुर्गतील चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सणासुदीच्या कालावधीत हे दर आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.