राणेंनी काय करावे काय करू नये हे ठाकरे सेनेने आम्हाला सांगू नये…


निलेश राणे यांचे कार्यकर्ते सक्षम त्यांना टक्केवारीची गरज नाही : शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला
मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टक्केवारीची गरज नाही. त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत, असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना लगावला आहे.

आमदार निलेश राणे यांचा पाहणी दौरा हा कार्यकर्त्यांच्या टक्केवारी वाढवण्यासाठी असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला होता. या टीकेला श्री. गावकर यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात मतदार संघातील कामे मार्गी लावली असती तर त्यांचा विधानसभेत जनतेने पराभव केला नसता. सगळ्याच गोष्टी या पैशाने विकत घेता येत नाही. मात्र विद्यमान आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यापासून आतापर्यंत मतदार संघातील रखडलेल्या कामांसाठी तसेच अन्य कामे मार्गी लागावीत यासाठी निधी आणण्याचे काम केले आहे. जी कामे आहेत ती दर्जेदार व्हावीत यासाठीच आमदार राणे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचा पाहणी दौरा हा टक्केवारी वाढविण्यासाठी असल्याचा खोबरेकर यांचा आरोप हास्यास्पद आहे. कारण आमदार राणे यांचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत त्यांना टक्केवारीची गरज नाही हे खोबरेकर यांनी ध्यानात घ्यावे.
गेल्या दहा वर्षात मतदार संघातील जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा निर्धार आमदार निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे मतदार संघातील विविध विकास कामांसाठी ते जास्तीत जास्त निधी आणून ती कामे मार्गी लावतील तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आमदार राणे यांनी काय करावे आणि काय करू नये हे ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही असेही श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.

