नवीन इमारतीच्या नुकसान प्रकरणी ठेकेदार,बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची मागणी


मालवण प्रतिनिधी :
जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळून नवीन इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी अथक प्रयत्न करून विविध परवानग्या मिळवून या बसस्थानकाची नवीन इमारत मंजूर केली आहे. मात्र एसटी प्रशासन आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे या नवीन इमारतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी संतप्त होत एसटी आगारात धडक देऊन आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांना जाब विचारला.
इमारत पाडण्याचे काम सुरु असताना आपले अधिकारी तेथे का नव्हते? नवीन इमारतीच्या नुकसानीस जबाबदार कोण? इमारत पाडत असताना प्रवाशांना दुखापत झाली असती तर? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. तसेच आगार व्यवस्थापक कार्यालयातून एसटी विभाग नियंत्रकांशी दूरध्वनीवर चर्चा करत ठेकेदार आणि बेजबाबदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी उमेश मांजरेकर, दीपक देसाई, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.


