जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल पाटील यांच्या विशेष उपस्थितीत मालवण सागर तळ स्वच्छता अभियान

मालवण प्रतिनिधी:
मालवण, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र – ९ एप्रिल २०२५, मालवण येथे “सागर तळ स्वच्छता अभियान ७.०” अंतर्गत जिल्हाधिकारी मा. श्री. अनिल पाटील व तहसीलदार मा. वर्षा झालटे, यांच्या उपस्थितीत भव्य समुद्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३६० किलो घातक कचरा, विशेषतः सागरी जैवविविधतेस धोका निर्माण करणारे घोस्ट नेट्स मोठ्या प्रमाणावर हटविण्यात आले.

ही महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम वनशक्तीच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली. कांदळवन कक्ष – मालवण, मालवण नगर परिषद, मत्स्य विभाग (मालवण), नीलक्रांती आणि यूथ बीट्स फॉर क्लायमेट यांनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल, मालवण, तसेच वेंगुर्ला मत्स्य विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. तसेच मालवण तालुक्याचे तलाठी मा. श्री. दळवी, नीलक्रांती संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविकिरण तोरसकर व मा. डॉ. ज्योती तोरसकर उपस्थित होते. स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते


सकाळी ८ ते दुपारी १:३० वाजे पर्यंत चाललेल्या मोहिमेत प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्सनी सुमारे ३ हेक्टर समुद्रतळ स्वच्छ करत घोस्ट नेट्स, प्लास्टिक व अन्य कचरा हटविला. या स्वच्छता मोहिमेने समुद्री प्रदूषणाचे गांभीर्य आणि पर्यावरणावरील मानवी हस्तक्षेपाचे दुष्परिणाम अधोरेखित केले. समुद्रात अनेक कारणांनी तुटलेले मासेमारी जाळी सतत समुद्री प्राण्यांना अडकवून जीवास गंभीर धोका, पर्यावरणीय असंतुलन निर्माण करतात आणि माणसाच्या अन्नसाखळीत सूक्ष्म प्लास्टिक प्रवेश करतो, त्यामुळे मानवी आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4195

Leave a Reply

error: Content is protected !!