… तर मालवण बसस्थानकात उबाठा शिवसेना ठिय्या आंदोलन छेडणार !


तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : येथील बस स्थानकाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून प्रवासी जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. येत्या दोन दिवसात जुनी इमारत न पाडल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला. दरम्यान जुन्या इमारतीमधील साहित्य नव्या इमारतीत हलविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या चार दिवसांत जुनी इमारत पाडली जाईल असे आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

येथील बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयात धडक देत याचा जाब विचारला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, नंदू गवंडी, उमेश मांजरेकर, महेश जावकर, बंड्या सरमळकर, प्रसाद चव्हाण, अक्षय भोसले, सुरेश मडये, स्थानक प्रमुख स्वप्नील गडदे, सहायक एस. एस. वाळके आदी उपस्थित होते. २६ मार्च रोजी येथील बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळून एक महिला प्रवासी जखमी झाली. ही घटना एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच दिरंगाईमुळे घडली. त्यामुळे याला एसटी प्रशासन जबाबदार आहे. आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे असा प्रश्न श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला. या बस स्थानकासाठी माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करून दिला होता. मात्र दहा वर्षे होऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. जुनी इमारत न पाडल्यास प्रवासी तसेच एसटीच्या कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होणार असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला. येत्या दोन दिवसांत जुनी इमारत न पाडल्यास याठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी एसटी प्रशासनास दिला.
यावर आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी सध्या जुन्या इमारतीमधील साहित्य नव्या इमारतीत हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. जुनी इमारत चार दिवसात पाडण्यात येणार असून त्याची कार्यवाही उद्यापासून सुरू होईल असे स्पष्ट केले. दरम्यान ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या इमारतीची पाहणी केली असता त्याठिकाणी प्रवासी बसले असल्याचे दिसून आले. जुन्या इमारतीत स्लॅब कोसळण्याची घटना घडली असल्याने याठिकाणी प्रवासी बसू नयेत यासाठी याठिकाणी ग्रीन नेट मारण्याची कार्यवाही करावी अशी सूचना श्री. खोबरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. नवीन इमारतीची पाहणी केली असता दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे इमारतीतून पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाल्याचे दिसून आले. याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर नव्या इमारतीवर शेड उभारण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

