आपला माणूस म्हणून वैभव नाईकांच्या पाठिशी रहा
माजी खा. विनायक राऊत यांचे आवाहन ; राणे पुन्हा धनुष्य हाती घेण्यासाठी लाचार
मालवण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी राज्यातून धनुष्यवाण हड़पार करण्याची डराव डराव बेडकाची डरकाळी दिली होती. मात्र त्याच शिवसेनेने त्याच धनुष्यबाणाने वैभव नाईक यांच्या रुपाने नारायण राणेना जमीन अस्मान दाखविले आणि राज्याच्या राजकारणातून राणेंना संन्यास घेण्यास भाग पाडले होते. आता नारायण राणे आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून अनेकांच्या पायऱ्या झिजवून पुन्हा धनुष्य हाती घेण्यासाठी लाचार झाले आहेत, असा टोला उबाठा शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर आयोजित उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेने आणि पैसे खाणाऱ्या व्यक्तींमुळे कोसळला आहे. आपण पुतळा उभारल्यानंतर आठ दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेत लक्ष वेधले होते. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या प्रश्नांकडे शासनाला देण्यासाठी वेळ नसल्याने अखेर आठ महिन्यांतच भ्रष्टाचाराच्या चौथऱ्यावर उभा राहिलेला पुतळा कोसळल्याने छत्रपतींचा अपमान झालेता आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मान शरमेने खाली झुकती आहे. याचा बदला घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करणे आवश्यक आहे. राजकोट पुतळ्याच्या दुरावस्थेकडे मी लक्ष वेधले तेव्हा केंद्र व राज्य शासनाने लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. संबंधित ठेकेदाराला फक्त २६ लाख रुपये देण्यात आले असून उर्वरित रक्कम गेली कुठे? याचा शोध पोलीस घेणार आहेत काय ? पुतळा दुर्घटनेतील वेल्डरला, तांत्रिक सल्लागार, शिल्पकार यांना अटक करण्यात आली असून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. ही लोकं बाहेर पडली, तर सत्ताधा-यांचे पितळ उघडे पडण्याची भीती भाजपच्या मंडळींना आहे. त्यामुळे घाईगडबडीत पुतळा उभारण्याचे आदेश कोणी दिले? उर्वरित रक्कम कोणाकडे गेली, याचाही शोध होऊन यातील दोषीवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, असेही श्री. राऊत पावेळी म्हणाले. आपला माणूस म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे, आणि त्यासाठीच सर्वांनी वैभव नाईक यांच्या पाठिशी ठामपणे उमे राहिले पाहिजे, असेही श्री. राऊत म्हणाले.