लोकसभेतील कोकणातला पराभव चटका लावून गेला, आता कोकणचं वैभव टिकवण्यासाठी वैभवच्या पाठीशी ठामपणे उभे रहा…
ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन ; छत्रपतींचा पुतळा पाडणाऱ्यांचा सूड घेतला नाहीत तर छत्रपतींचा जयजयकार करण्याचा अधिकार राहणार नाही
तिकडे केसरकर आणि इकडे चिली पिली पडली तरच कोकणाचं भलं होईल ; कोकणचं चांगलं करेन हा माझा शब्द
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर पार पडली. या सभेत ठाकरेंनी मोदी शहा यांचा खरपूस समाचार घेत राणे पिता पुत्र आणि दीपक केसरकरांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेला आपण थोडे कमी पडलो, सहाजिकच कोकणातला पराभव मला चटका लावून गेला, असे सांगत कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण हे नाते कोणी तोडू शकत नाही. कोकणावर कोणतेही संकट आले तर शिवसेना धावून येते आणि सेनेवर संकट जाते तर कोकण धावून येते. आज शिवसेनेला कोकणची साथ हवी आहे. शिवसेना आणि अख्खा महाराष्ट्र संकटात आलोला आहे. यामुळे कोकणचे वैभव टिकविण्यासाठी तुम्हाला आमच्या वैभवच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे, असेही श्री. ठाकरे म्हणाले. मालवणात भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणाऱ्यांवर सूड घेण्याची हीच वेळ आहे. तसे न केल्यास तुम्हाला छत्रपतींचा जयजयकार करण्याचा अधिकार राहणार नाही, असे सांगून तिकडे दीपक केसरकर आणि इकडे चिली पिली पाडल्याशिवाय कोकणचं भलं होणार नाही. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आणि त्यानंतर कोकणचं भलं करेन हा माझा शब्द आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या सभेला शिवसैनिकांची मोठी गर्दी होती.
वैभव तुला देखील ५०-५० खोके मिळाले असते, मंत्रीपदाचीही ऑफर आती होती. पण तू वाकला नाहीस, दबला नाहीस. मिंधे प्रमाणे मोदी-शहांचा लाचार झाला नाही, त्यामुळे वैभव तुझा मला अभिमान आहे, असे सांगत उद्धव ठाकरेंनी आमदार वैभव नाईक यांचे कौतुक करत वैभव नाईक यांच्या मशाल निशाणीला मतदान करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन केले.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर प्रचार सभेत श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उबाठाचे उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार परशुराम उपरकर, उपनेत्या सौ. जान्हवी सावंत, भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिल्पा खोत, नितीन वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व्हिक्टर डान्टस, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडिस, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, पूनम चव्हाण, उबाठा शहरप्रमुख बाबी जोगी, महिला तालुका प्रमुख दीपाली शिंदे, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, युवा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, बाळू अंधारी, निनाशी शिंदे, बाळ महाभोज, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, उमेश मांजरेकर, श्वेता सावंत, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, उल्हास तांडेल, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, मंदार ओरस्कर, पंकज वर्दम, अमित भोगले, सिद्धेश मांजरेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने मला संपवायचा प्रयत्न केला. आजसुद्धा त्यांचा तो प्रयत्न चालला आहे. पण मी जो काही आहे ते तुमच्या भरोशावर आहे. तुम्ही जोपर्यंत साथ सोबत द्याल तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी शहा मला संपवू शकत नाही. तुमच्या रुपाने आई जगदंबेने मला सुरक्षा कवच दिलं आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली. आज मोदी व शहा शिवसेना संपवू निघाले आहेत. एवढे घाणेरडे प्रकार राजकारणात कधीच झाले नव्हते. पक्ष फुटतात, कधी नेते या पक्षातून त्या पक्षात जातात. पण एवढा निचपणा आजपर्यंत कोणीत्याही राजकीय पक्षाने केला नाही. कोणे एकेकाळी असलेल्या मित्रपक्षानेच निचपणा केल्याने मला दुखः झाले व मला रागही आता आहे, असेही श्री. ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपा नव्हती पण तेव्हा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूतदया, माणुसकी हिंदुत्व म्हणून सोबत घेत भाजपला खांद्यावर घेतले. पण ते एवढे निच निघाले काम झाल्यावर वापरून फेकून द्यायला निघाले. बाळासाहेबांनी तेव्हा दूर ठेवले असते तर आज भाजपा औषधालाही महाराष्ट्रात दिसती नसती, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांवर निशाणा साधला. लोकसभा मतदार संघांमध्ये जी गर्दी होत होती, ती एका एका विधानसभा मतदार संघासाठी होत आहे. आजच्या सभेसाठी प्रचंड गर्दी झाली आहे, असे श्री. ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल पेटली असून आता सत्तेची मशात प्रज्यलित होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचेही श्री. ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. जाता कोकणात चांगली सुरवात होणार आहे. आता आपल्या हातात मशाल आहे त्यामुळे अंधार होण्याची भीती नाही, असे ते म्हणाले.
आडवा आलास तर आडवा करून जाणार
खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना रस्त्याने जाऊन दाखवा या दिलेल्या आव्हानाचा धागा पकडत श्री. ठाकरे म्हणाले, नशीबाने दिले ते घरी बसून नीट खा. वेडावाकडा होऊ नको, आडवा आलास तर आडवाच करू असा इशारा देत तेवढी ताकद व हिम्मत शिवसेनेत असल्याचे सांगितले. तुम्हा सगळ्यांना कोकणचे वैभव जपायचे आहे की नाही, वैभव हवा की नको कि पुन्हा गुंडापुंडांचे राज्य हवे असा सवाल श्री. ठाकरे यांनी केला. शिवसेना संपावयाची असेल तर मर्द असाल तर समोर येवून लढा. सरकारी यंत्रणांची मदत घेऊन उगाच अडवणूक करून संपवण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास तुम्हाला शिवसेना संपविणे कधीच शक्य होणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले
यावेळी तारकर्लीच्या माजी सरपंच स्नेहा केरकर आणि तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र केरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. सूरसंचालन नितीन वाळके यांनी केले. तर आभार तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मानले.