मालवणात उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी ; आ. वैभव नाईकांकडून सभास्थळाची पाहणी
उद्धव ठाकरेंना कोणी अडवू शकत नाही, हे आम्ही दाखवून देऊ : आ. नाईक यांचा इशारा
मालवण : महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी टोपीवाला हायस्कुल येथे भव्य स्टेज उभारण्यात आले असून सुमारे ३ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेचा ट्रेलर जाहीर करण्यात आला असून ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ असे या सभेस संबोधण्यात आले आहे. तसेच ‘स्वराज्याचा स्वाभिमान जपूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया’ असेही म्हटले आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, मालवण कुडाळ मधून मोठ्या संख्येने जनता या सभेस उपस्थित राहील, उद्धव ठाकरे यांना अडवू असे कोणी म्हटले तरी ते उद्धव ठाकरे यांना अडवू शकत नाहीत, हे सभेच्या वेळेनुसार आम्ही दाखवून देऊ, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी मालवण कुडाळ मधील कार्यकर्त्यांनी जोर लावला आहे. यातच या मतदार संघांसाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा मालवण येथे आयोजित करण्यात आली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेची जोरदार तयारी टोपीवाला हायस्कुलच्या मैदानावर करण्यात येत असून ६० ते १०० मान्यवर बसतील एवढ्या क्षमतेचे स्टेज उभारण्यात आले आहे. तर स्टेजसमोर ३ हजार लोक बसतील एवढ्या क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी सर्व सोयी सुविधा तैनात करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या समवेत महाविकास आघाडी मधील ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
आमदार वैभव नाईक सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत जिंकण्याच्या ताकदीने उतरले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. जाहीर प्रचार सभा पाहून विरोधकांना त्यांची जागा दिसून येणार आहे. ही सभा नसून आमचा विजयोत्सव असणार असल्याचेही खोबरेकर यांनी सांगितले.
आ. वैभव नाईक यांच्याकडून सभास्थळी पाहणी
या सभेसाठी जय्यत तयारी सुरु असून या तयारीची पाहणी आम. वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह केली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, यशवंत गावकर, रश्मीन रोगे, अन्वय प्रभू, अनंत पाटकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी वैभव नाईक म्हणाले, कोरोना व तौक्ते वादळावेळी तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काय काम केले हे जनतेला, मालवणवासियांना माहित आहे, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारांना सोडणार नाही ही भूमिका उद्धव ठाकरे सभेत मांडणार आहेत, या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असेही आम. नाईक म्हणाले.