सिंधुदुर्ग मधील राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करा ; आ. वैभव नाईक यांचे आवाहन
आ. नाईक यांची चिंदर येथे गावभेट ; जनतेने आतापर्यंत साथ दिली, तशीच द्यावी
मालवण : आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांनी चिंदर येथे गावभेटीदरम्यान केले आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, भ्रष्टाचार टक्केवारी, दडपशाही व घराणेशाहीचे जिल्ह्यातील राजकारण संपवायचे असेल तर या मतदार संघातील कलंक पुसला पाहिजे. समाजातील जातीजातीमध्ये द्वेश पसरवण्याचे काम राणे परिवार करत आहे. या मतदारसंघात शांतता समृद्धी आणायची असेल तर राणे नावाच्या प्रवृत्तीला थारा देऊ नका असे आवाहन वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना केले.
ज्याने शिवसेना संपवण्याचे भाषा केली त्यांनाच शिवसेनेत आपल्या मुलाचा प्रवेश घेण्याची वेळ आली आहे. शिवसेना संपली,असे सांगतात त्यांना शिवसेना प्रवेश घेण्याची वेळ का आली आहे.आमचा लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी, संपत्ती कमवण्यासाठी नाही. गेली ३५ वर्षे या जिल्ह्यावर राणे परिवारची सत्ता आहे. या जिल्ह्याने त्यांना आमदार केले, मंत्री ,मुख्यमंत्री,केंद्रीय उद्योग मंत्री केले. त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केले असा सवाल देखील यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करत सिंधुदुर्ग मधील राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.