निलेश राणेंना वाढता प्रतिसाद ; धास्तावलेल्या वैभव नाईकांवर वयोवृद्ध आईला प्रचारात उतरवण्याची वेळ
मालवण शहर भाजपा महिला आघाडीची टीका ; दहा वर्षे विकास केला असता तर ही वेळ आली नसती
मालवण (प्रतिनिधी) महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मागील चार वर्षात कुडाळ मालवण मतदार संघात संघटनात्मक केलेले काम आणि महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात मतदार संघातील गावागावात विकास पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न यामुळे यंदाच्या निवडणुकीत निलेश राणे यांना जनतेतून वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकली असून यामुळेच दहा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या वयोवृद्ध आईला प्रचारात उतरवण्याची वेळ आली आहे. मागील दहा वर्षात आ. वैभव नाईकांनी विकास कामे केली असती तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका मालवण शहर भाजपा महिला आघाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अन्वेषा आचरेकर, उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, चिटणीस महिमा मयेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर, व्यापारी संघटना महिला अध्यक्ष अमिता न्हिवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नारायण राणे यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून वैभव नाईक हे २०१४ मध्ये कुडाळ मालवण मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर मागील २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांचा पराभव करून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. या दहा वर्षात साडे सात वर्षे ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. त्यातील अडीच वर्षे त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री होते. तरीही मतदार संघात दाखवता येईल असा विकास ते करू शकले नाहीत. अडीच वर्षांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार यांचे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राणे यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्यातून गावागावात विकास नेण्याचा प्रयत्न केला. सत्तेचे कोणतेही पद नसताना निलेश राणे यांनी केलेल्या कामामुळे जनता प्रभावित झाली असून यामुळेच यंदाच्या निवडणुकीत निलेश राणे यांना जनतेतून प्रतिसाद वाढत आहे. यामूळेच वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यांनी स्वतःच्या वयोवृद्ध आईला स्वतःच्या प्रचारात उतरवले आहे.
माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे आणि त्यांचे कुटुंब देखील निलेश राणे यांच्यासाठी प्रचारात उतरले आहे. मात्र राणेकुटुंब हे गेली ३० ते ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून खा. नारायण राणे, सौ. नीलमताई राणे येथील जनतेच्या सुखदुःखात नेहमी कार्यरत असतात. महिलांच्या संघटनेला नीलमताईंचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. पण वैभव नाईक यांच्या पत्नी केवळ निवडणुका आल्या की प्रचारासाठी घराबाहेर पडतात. तर आताच्या निवडणुकीत राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या स्वतःच्या वयोवृद्ध आईला वैभव नाईक यांनी स्वतःच्या प्रचारासाठी घराबाहेर काढले आहे. परंतु, आता जनता सुज्ञ असून सहानुभूतीची कोणतीही लाट येऊन त्याचा वैभव नाईक यांना फायदा होणार नाही. निलेश राणे किमान ५० हजाराच्या फरकानी आमदार होणारच असा विश्वास भाजपा महिला आघाडीने व्यक्त केला आहे.