विनायक राऊतच करणार वैभव नाईकांचा “गेम” ; ठाकरेंची सभा जाणीवपूर्वक तुलसीविवाहाला !
धोंडू चिंदरकर यांचा दावा ; सभेला गर्दी जमवण्यासाठी आमदारांनी वाळू व्यवसायिंकांच्या भैय्याना केले पाचारण
निलेश राणेंची प्रचारात आघाडी ; अखेरचा उपाय म्हणून उबाठाकडून शांतता बिघडवण्याचे षडयंत्र आखण्याची भीती
मालवण | कुणाल मांजरेकर
लोकसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनी काम न केल्याने तत्कालीन खासदार विनायक राऊत यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हे शल्य आजही विनायक राऊत यांना लागून राहिले आहे. त्यामुळेच वैभव नाईकांच्या प्रचारानिमित्त मालवणात होणारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा यशस्वी होऊ नये म्हणून विनायक राऊत यांनी जाणीवपूर्वक तुलसी विवाहाच्या संध्याकाळी लावली असून महिला व पुरुष तुलसी विवाहात अडकणार असल्याने ही सभा यशस्वी होऊ नये, याची काळजी विनायक राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सभेला गर्दी जमवण्यासाठी आमदारांकडून वाळू व्यवसायिकांच्या भैय्या कामगारांना बोलावण्यात आल्याचा दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केला आहे. दरम्यान, कुडाळ मालवण मध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. किमान ५० हजारांच्या मताधिक्याने निलेश राणे विजयी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे गटाकडून मतदार संघातील शांतता बिघडवण्याचे षडयंत्र आखले जाण्याची भीती देखील श्री. चिंदरकर यांनी व्यक्त केली आहे.
येथील भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, शहर प्रभारी संतोष गावकर, महेश मांजरेकर, विजय ढोलम, मंगेश चव्हाण, कमलाकर कोचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा नियोजनबद्ध प्रचार सुरु आहे. स्वतः निलेश राणे ग्राउंड लेव्हलला काम करत असून खा. नारायण राणेसाहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे जातींनीशी प्रचार यंत्रणा सांभाळून आहेत. त्यामुळे निलेश राणे हे किमान ५० हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. कुडाळ मालवण मध्ये आता जनतेलाच बदल अपेक्षित आहे. वैभव नाईक हे मागील दहा वर्षात पूर्णपणे अपयशी ठरले असून या कालावधीत ते आमदार म्हणून कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे आता वैभव नाईक हे माजी आमदार होणार यामध्ये शंका नाही. जनतेने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिल्यावर विकास कामे होत नसतील तर उपयोग काय ? प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आश्वासना व्यतिरिक्त काहीच दिले नाही.
निवडणुकीच्या तोंडावर कोणाच्या तरी क्लिप बाहेर काढून मतदानावर त्याचा परिणाम होईल या भ्रमात वैभव नाईक यांनी राहू नये. त्यांना आता जनतेने नाकारले असून त्यामुळेच ते अशा गोष्टी करत आहेत. पुढे जाऊन निवडणुकीत शांतता बिघडवण्याचे कुट कारस्थान ते करतील अशी भीती आहे. पण भाजपाने ही निवडणूक शांततेत घेण्याचे ठरवले आहे, असे धोंडू चिंदरकर म्हणाले.
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी मालवणात सभा घेणार आहेत. विनायक राऊत हे यापूर्वी खासदार होते. त्यांच्या निवडणुकीत वैभव नाईक यांनी काम केलेले नाही. त्यामुळेच उदयाची सभा फ्लॉप होण्यासाठी विनायक राऊत यांनी तुलसी विवाह धरून ही सभा ठेवली आहे. विनायक राऊत यांनी जाणीवपूर्वक ही तारीख दिली आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. त्यामुळे उद्याची सभा यशस्वी करण्यासाठी वैभव नाईक व कंपू भैया कामगारांना चांगले कपडे घालून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून आज गावागावात उबाठाचे कार्यकर्ते महायुतीत दाखल होत आहेत. कारण वैभव नाईक यांच्यावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे निलेश राणे किमान ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील. अलीकडील सर्वच निवडणुकांमध्ये भाजपाने यश मिळवले असून आमदारकीच्या निवडणुकीत देखील त्याची पुनरवृत्ती होईल आणि त्यांनतर होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमद्ये देखील भाजपा महायुतीची घोड दौड कायम राहील, असा विश्वास धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे