जगदीश चव्हाण, रूपेश पिंगुळकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण नाभिक समाजाला वेठीस धरू नये
नाभिक समाज महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे यांचा सल्ला ; समाजाला विश्वासात न घेता महायुतीला पाठींबा दिल्याचा आरोप
मालवण : नाभिक समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकारीणीची बैठक न घेता किंवा नाभिक समाजबांधव सोडाच पण कार्यकारीणी सदस्यानाही विश्वासात न घेता महायुतीच्या जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांना परस्पर पाठिंबा घोषीत केल्याचा आरोप नाभिक समाज संघटनेच्या मालवण येथील महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे यांनी केला आहे.
मी स्वतः नाभीक समाजाची महिला तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहे, मात्र राजकारणात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावान शिवसैनिकही आहे आणि महिला तालुका संघटकही आहे. मी माझे स्वतःचे वैयक्तिक मत तर वैभव नाईक यांना देणार आहेच, पण माझ्या संपर्कातील प्रत्येकाला वैभव नाईक यांनाच मत द्यायचा आग्रह करणार आहे. समाजातील सर्व बांधवांना लोकशाहीचा अधिकार आहे आणि संपूर्ण नाभिक समाज सुशिक्षित, विचारी आणि सुज्ञ सुद्धा आहेत. त्यामुळे जगदीश चव्हाण, रूपेश पिंगुळकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण नाभिक समाजाला वेठीस धरू नये. संपुर्ण मतदार संघातील समाजबांधव निष्ठेचे पाईक असलेल्या वैभव नाईक यांच्याच सोबत राहतील, याची मला खात्री आहे, असे दीपा शिंदे यांनी म्हटले आहे.