मालवणच्या मनोरंजन क्षेत्राला आलेली अवकळा होणार दूर !
देवबाग मधील “मत्स्यगंधा समर्थ थिएटर” चे शुक्रवारी उद्घाटन
मालवण तालुक्यातील पहिलेच मिनिप्लेक्स देवबाग
कोकणातील पारंपरिक कलांचे एकाच रंगमंचावर एकत्रित सादरीकरण होणार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण मधील सरस्वती चित्रमंदिर बंद झाल्यानंतर मालवणच्या मनोरंजन क्षेत्राला आलेली अवकळा दूर होणार आहे. तालुक्यातील देवबाग मध्ये पी अँड पी समूह प्रा. लिमी. देवबाग ग्रामपंचायत यांच्या वतीने मालवण तालुक्यातील पहिले मिनिप्लेक्स खुले होत आहे. शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी या मिनिप्लेक्सचा शुभारंभ होणार आहे. यानिमित्ताने कळसूत्री बाहुल्या, दशावतार आणि गजानृत्य या कोकणातील तिन्ही पारंपरिक कलांचे एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण पहाण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच नवनिर्माण हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याची संधी देखील यानिमित्ताने मिळणार आहे.
कोकणच्या सांस्कृतिक कलांना एक वेगळी परंपरा आहे. दशावतार, गजनृत्य, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अशा एक ना अनेक पारंपरिक कलांचा आनंद पर्यटकांना आता मालवण तालुक्यातील देवबाग येथे घेता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांची सांस्कृतिक कलांची परंपरा जपणाऱ्या आणि ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या देवबागच्या मत्स्यगंधा समर्थ थिएटरने खास पर्यटक तसेच उद्योजक, व्यावसायिकांसाठी एक वेगळी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. येथील मिनीप्लेक्सचे उद्घाटन शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी देवबाग सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाचे मालवण येथील शाखा व्यवस्थापक राम गोपाल यादव, कणकवलीचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे उपस्थित राहणार आहेत.
देवबागच्या निसर्गरम्य परिसरात १३७ आसन क्षमता आणि सोबतच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सोफा- कोच अशी व्यवस्था असलेला छोटेखानी मिनिप्लेक्स याठिकाणी साकारण्यात आला आहे. येथे २६×११ चौरस फुटांचा भव्य स्क्रीन, ३०×१५ चौरस फुटांचा स्टेज, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, आकर्षक लाईट सिस्टीम, पुशबॅक चेअर्स, वातानुकुलित यंत्रणा, जनरेटर बॅकअप त्याचप्रमाणे स्वच्छतागृह यासारख्या पंचतारांकित व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पंचतारांकित मिनिप्लेक्स मध्ये आठवड्यातील काही विशिष्ट दिवस सिंधुदुर्गातील हौशी तसेच व्यावसायिक कलाकारांच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून येथील पारंपारिक कलांचा आनंद लुटता येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योजक, व्यावसायिक यांना त्यांच्या कंपनीच्या मीटिंग, बोर्ड मीटिंग, डॉक्यूमेंट्री किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन येथे करता येणे शक्य आहे. छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमही येथे आयोजित करण्याची संधी देण्यात येणार असून पर्यटनाबरोबर व्यवसायिक वृद्धीसाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठीही या मिनीप्लेक्सचा वापर माफक दरात उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी येथे सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. पासून हिंदी व मराठी सिनेमा येथे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून नवीनच प्रदर्शित होणारा सूर्यवंशी हा चित्रपट येथे प्रदर्शित होणार असल्याची माहिती पी अँड पी समूह प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देण्यात आली आहे.