महेश कांदळगावकर यांची शिवसेना जिल्हा संघटकपदी नियुक्ती
महायुतीचे उमेदवार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील अभ्यासू नेतृत्व असलेल्या माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली आणि कुडाळ विधानसभा मतदार संघाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे, उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री. कांदळगावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास या नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, नीलम शिंदे आदी उपस्थित होते. या नियुक्तीसाठी शिफारस केल्याबद्दल महेश कांदळगावकर यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे तसेच पक्ष निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर , उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.