कुडाळ – मालवण मतदार संघातून महायुतीकडून निलेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

दहा वर्षात मतदार संघाची हेळसांड, विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज : निलेश राणे यांचा विश्वास

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी खासदार निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी कार्यकर्त्यांच्या उत्साहात दाखल करण्यात आला. आमच्या सोबत जनता आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला माझे प्राधान्य राहणार असून गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ओसाड होता. आपल्या भूमीची आपल्या जनतेची जी हेळसांड झाली, त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी सज्ज झालो आहे, असे प्रतिपादन निलेश राणे यांनी केले.

यावेळी खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांसह उपस्थित नेतेमंडळी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. मी कोणावर टीका करणार नाही. जनतेची सेवा हेच माझे लक्ष राहील. यापूर्वी जनतेने २८ व्या वर्षी खासदार बनवले. आता विधासभेसाठी पहिल्यांदा अर्ज भरणा करतोय. या मातीने येथील जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले. त्या जनतेची सेवा करायची आहे. जनतेला गृहीत धरणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने मोठे मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न राहील. कुडाळ-मालवण सोबत सिंधुदुर्ग पर्यायाने महाराष्ट्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, रिपाई नेते आणि सर्व महायुती पदाधिकारी यांचे निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. राजकारणात सक्रिय झाल्यापासूनचं काम माय-बाप जनतेसमोर स्पष्ट आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील एक ही मत आपण आता वाया जाऊ देणार नाही, आपली भूमी पुन्हा भ्रष्टांच्या हाती जाऊ देणार नाही. असेही निलेश राणे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!