दत्ता सामंत यांनी घेतली राणे कुटुंबियांची भेट ; “त्या” अफवांना पूर्णविराम !
निवडणुकीच्या तोंडावर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असफल ; निलेश राणेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार
मालवण | कुणाल मांजरेकर
माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयात कुडाळ मालवण मतदार संघातून त्यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात महत्वाचा हातभार लावणारे कट्टर समर्थक तथा उद्योजक दत्ता सामंत नाराज असून ते वेगळा निर्णय घेण्याच्या अफवांना जिल्ह्यात उत आला होता. मात्र आज दत्ता सामंत यांनी कणकवलीत राणे कुटुंबाची भेट घेऊन या अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असफल ठरला आहे.
राणे समर्थक असलेले दत्ता सामंत यांच्या बद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू होत्या. दत्ता सामंत राणे कुटुंबियांपासून फारकत घेतील अशीही चर्चा सुरु करण्यात आली होती. मात्र दत्ता सामंत यांनी आपण राणे कुटुंबियातील एक घटक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आज कणकवलीत त्यांनी खा. नारायण राणे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सौ. नीलम राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दत्ता सामंत यांनी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करून विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असा शब्द त्यांनी दिला आहे.