मलपी हायस्पीड ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाविरोधात आर या पारची लढाई 

“त्या” हायस्पीड ट्रॉलरवर विकी तोरसकरांचे लाक्षणिक उपोषण सुरु ; गरज पडल्यास आमरण उपोषण

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेले कित्येक वर्ष मलपी कर्नाटक येथील हाय स्पीड ट्रॉलरची घुसखोरी सुरु आहे .त्यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या तोंडचा घास पळून नेला जात आहे. या बेकायदेशीर मासेमारी विरोधात आर या पारची लढाई म्हणून मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांनी सर्जेकोट बंदरात मत्स्यव्यवसाय खात्याच्या ताब्यात असलेल्या हायस्पीड ट्रॉलरवर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. गरज पडल्यास आमरण उपोषण छेडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

बेकायदा मासेमारी विरोधात मच्छीमारांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदन, उपोषण व आंदोलनाद्वारे आपला आवाज उठवला आहे. कर्नाटकातील या हायस्पीड ट्रॉलरची मजल सागरी गस्त करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहेत. तसेच लाखो रुपयांची स्थानिक मच्छीमारांची मासेमारी करण्याची जाळी या ट्रॉलर्सनी तोडून नेली आहे. नुकताच मलपी येथील बेकायदेशीर मासेमारी करणारा हायस्पीड ट्रॉलर्स सिंधुदुर्गच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये मत्स्य खात्याने पकडला होता. त्यामध्ये सुमारे सहा टन मासे आढळून आले होते. अशा प्रकारचे शेकडो ट्रॉलर्स सध्या सिंधुदुर्ग व उर्वरित महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालून झुंडीने येत दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्या या झुंडशाहीमुळे मच्छीमारांचे जीव पण धोक्यात आले आहेत. शासन दरबारी याची नोंद घेऊन ज्या प्रकारे कारवाई व्हायला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. याकडे तात्काळ लक्ष वेधून वेगवान कारवाई करण्यासाठी विकी तोरसकर यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. गरज पडल्यास आपण आमरण उपोषण सुरू करणार आहे. तरी सर्व मच्छीमारांनी आपापसातील वाद व भेदभाव बाजूला ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन श्री. तोरसकर यांनी केले असून याठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!