आता एकच लक्ष… दीपक केसरकरांचा विजय ; संजू परबांनी केले जाहीर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे

सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर

सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. गेले कित्येक दिवस मी विधानसभा लढवणार असं म्हणत होतो. मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कित्येक वर्षानी स्वगृही परतल्याचा आनंद झाला असल्याचे सांगतानाच दीपक केसरकर हे युतीचे अधिकृत उमेदवार असल्याने महायुतीचा सन्मान राखून मी हा निर्णय मागे घेत आहे. आता आमचे एकच लक्ष आहे, ते म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय. यासाठी मी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहे. दीपक केसरकर यांचा किमान ५० हजार मताधिक्याने विजय होईल. दीपक केसरकर यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याचे उत्तर जनताच देईल, असा विश्वास संजू परब यांनी व्यक्त केला.

सावंतवाडीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विनोद सावंत, झेवियर फर्नांडिस, परिक्षीत मांजरेकर, हेमंत बांदेकर, सत्यवान बांदेकर, कलेटस फर्नांडिस, दिनकर नाईक, बंड्या कोरगावकर, नितीन गावडे, सुरेश माळकर आदी उपस्थित होते. श्री. परब म्हणाले, यापूर्वी भाजपमध्ये असताना आमचे नेते माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काम केले. त्यांच्या सहकार्यानेच सावंतवाडी शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करता आले. त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही. भाजपची काम करण्याची पद्धत जवळून पाहता आली. याच अनुभवातून पुढे काम करण्यास मदत होणार असून सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने शहरात किमान ३ ते ४ हजाराचे मताधिक्य मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही शिवसेने पासूनच झाली होती. आता निलेश राणे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आनंद आहे. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आमच्या सोबत असून दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!