राणे पितापुत्रांच्या हस्तक्षेपानंतर मालवण बंदरजेटीवरील स्टॉल हटाव मोहीम स्थगित
माजी खा. निलेश राणेंची मध्यस्थी ; स्टॉलधारकांनी मानले आभार : व्यावसायिकांना विस्थापित न करता त्यांची व्यवस्था करण्याचे खा. नारायण राणे यांचे बंदर विभागाला आदेश
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण बंदरजेटी याठिकाणी वर्षानुवर्षे तात्पुरते स्टॉल उभारून पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे स्टॉल हटविण्याची कार्यवाही गुरुवारी बंदर विभागाने हातात घेतली. या कारवाईसाठी सकाळीच मोठा फौजफाटा बंदर जेटीवर दाखल झाला. या कारवाईबाबत व्यावसायिकांनी तात्काळ माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. यावर निलेश राणे यांनी तुमच्यावर अन्याय होणार नाही, मी तुमच्या पाठिशी राहणार आहे, असे आश्वासन दिले. तर खासदार नारायण राणे यांनी तात्काळ बंदर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणीक मुरकळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून संबंधित स्टॉलधारकांना विस्थापीत न करता त्यांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आज सुरू करण्यात आलेली कार्यवाही तात्काळ थांबविण्यात यावी, अशी सूचना केली. यानंतर बंदर विभागाने आपली कारवाई स्थगित केली आहे.
बंदर विभागाकडून गेले काही दिवस पार्किंग ठिकाणावर गाड्यांची वाहतूक थांबविण्यासाठी एका बाजूने खुल्या असलेल्या ठिकाणी खांब उभे करण्यात आले होते. जेणेकरून त्याठिकाणाहून रिक्षा अगर इतर मोठी गाडी जाणे बंद करण्यात आले होते. त्याबद्दलही वाहन चालकांतून व मच्छीमारांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर आज पार्किंग ठिकाणी उभारण्यात येत असलेले स्टॉल हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि इतर प्रशासकीय बळ उभे करण्यात आले होते. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाई करण्यात येणार होती. पोलीस बंदोबस्त उपस्थित झाल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रशासकीय पातळीवर स्टॉलधारकांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याने अशाप्रकारे जबरदस्ती करण्यात येवू नये अशी भूमीका मांडली.
दरम्यान, स्टॉलधारकांनी तातडीने माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. श्री. राणे यांनी स्टॉलधारकांची बाजू ऐकून घेत तात्काळ बंदर विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत कारवाई थांबविण्याची सूचना केली. स्टॉलधारकांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्टॉलधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यावर पर्याय काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. राणे यांनी केलेल्या चर्चेनंतर बंदर विभागाने आपली कारवाई मागे घेतली, स्टॉलधारकांनी श्री. राणे यांचे आभार मानले.
निलेश राणेंचे मानले आभार
स्टॉलधारकांनी कारवाई थांबविण्यात आल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत त्यांचेही आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेत श्री. राणे यांनी कारवाई थांबली नसती तर मी स्वतः तुमच्यासोबत उभा राहिलो असतो. कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी आपण तुमच्यासोबत आहे. गेली वर्षानुवर्षे आपण त्याठिकाणी व्यवसाय करत असल्याने तुमचा विचार करूनच त्याठिकाणी पुढील कार्यवाही केली पाहिजे असेही श्री. राणे यांनी सांगितले.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर, भाई मांजरेकर, राजू विडये तसेच इतर उपस्थित होते.