सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल

भाजपचे मालवण शहर मंडल अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया ; मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्याचे महायुतीचे सरकार मच्छिमारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करत असून महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करून ७२० किमी कोकण किनारपट्टीवर वसलेल्या मच्छिमारांसाठी शासनाने क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या १२१ किमीवर वसलेल्या २५००० कुटूंबासाठी यांचा लाभ होणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मालवण शहर मंडल अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास राज्यसरकारने मान्यता दिली असून या माध्यमातून सागरी क्षेत्रातील मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे, परंपरागत मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांचे हित जतन करणे, सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या मच्छिमारांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे, मासेमारी उत्पन्न, विक्री त्यावरील प्रकिया उद्योग याबाबतीत शासनास उपाय सुचविणे, मासे सुकविणे, मासे वाळविणे, विक्री तसेच मासे जास्त काळ टिकून राहण्यासाठी उपाय सुचविणे, मच्छिमार समाजाच्या आर्थिक व सामाजिक स्तर वाढविण्यासाठी कार्य करणे हा या सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळाचा उद्धेश आहे. महाराष्ट्र राज्य मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्वायत्त व स्वयंपुर्ण असावे यासाठी राज्यसरकार कडून एकावेळचे ५० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. सदर मंडळाचे अध्यक्ष मत्स्यव्यवसाय मंत्री, उपाध्यक्ष राज्यमंत्री मत्स्यव्यवसाय, सचिव मत्स्यव्यवसाय,उपसचिव मत्स्यव्यवसाय,सागरी सहआयुक्त मत्स्यव्यवसाय,जिल्हास्तरीय संस्था ५ प्रतिनिधी अशी रचना असणार आहे. अश्या प्रकारचे मच्छिमारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्य करणारे मंडळ होण्यासाठी भाजपा मालवण, गाबीत फिशरमन फेडरेशन अध्यक्ष व राज्य मत्स्यधोरण समिती सदस्य म्हणून मी सातत्याने मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, सिंधुदुर्ग, पालघर पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सदर मागणी मान्य झाल्याने मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे विष्णू मोंडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!