मालवणात भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने बालकाला दुखापत

युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांची नाराजी ; नगरपालिका तात्काळ ॲक्शन मोडवर ; भटके कुत्रे पकडण्यासाठी निविदा मागवली

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून काही दिवसांपूर्वी शहरातील देऊळवाडा भागातील एका महिलेचा कुत्र्याने चावा घेतला होता. रविवारी त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा चावा कुत्र्याने घेतल्याने मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ठाकरे गट युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याबाबत पालिकेने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेची पालिकेने गंभीर दखल घेतली असून पालिकेने शहरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी निविदा जारी केली आहे. या निविदेची ही दुसरी मागणी आहे.

मालवण शहरात गेल्या काही वर्षापासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शहरात कुत्र्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये – जा करावी लागत आहे. नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुत्रे निर्बीजीकरण मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेत कोणतेही सातत्य ठेवण्यात आलेले नाही. यामुळे मालवण शहरातील कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. देऊळवाडा भागातही कुत्र्यांचा संचार वाढला असून काही दिवसापूर्वी एका महिलेवर कुत्र्याने हल्ला चढवत चावा घेतल्याची घटना घडली होती. या घटनेने या परिसरात घबराट पसरली असतानाच त्याच महिलेच्या लहान मुलाच्या पायाचा कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामध्ये या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

मालवण शहरात कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवत तसेच नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरली आहे, अशी टीका युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी केली आहे.

नगरपालिकेने तात्काळ निविदा मागवली

देऊळवाडा येथील या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेने शहरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी निविदा मागवली आहे. यात नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडणे व त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करणे, औषधोपचार करून त्यांना अधिवासात सोडणे या कामासाठी सहा महिने कालावधी करिता निविदा मागवली आहे. तर मोकाट गुरे पकडण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी देखील एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवण्यात आली आहे 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!