कोळंब ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा ; महिलांचा लक्षणीय सहभाग
ऐन गणेशोत्सवात पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची नाराजी ; लवकरात लवकर पाणी उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्याची सरपंचांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
कोळंब गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून ऐन गणेशोत्सवात ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढला. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत आपले म्हणणे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासमोर मांडले. सरपंच सिया धुरी यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना सामोरे जात लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. पाणी कामगाराला निश्चीत केलेले मानधनही देण्यात आलेले नसल्याने तातडीने मानधन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सर्व नळधारकांना पाणी पुरवठा होत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा कोणालाच करण्यात येवू नये अशीही भूमिका यावेळी उपस्थित असलेल्या शिष्टमंडळाने घेतली.
पिण्याच्या पाण्यासाठी कोळंब ग्रामस्थांनी ग्रा. पं. वर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसचिव, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्या संजना शेलटकर, संपदा प्रभू यांच्यासह १५७ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. इशाऱ्याप्रमाणे मंगळवारी सकाळी ११ वाजता गावकर दुकान ते ग्रामपंचायत कार्यालय असा कळशी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने संदीप शेलटकर, विजय सारंग, बाळा केळुसकर, बाबु धुरी, अंजली कोयंडे, सदानंद सारंग, गणेश नेरकर, मिनल परब तसेच इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते. आम्हाला पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशाप्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आला. मोर्चाच्या निमित्ताने कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
यावेळी झालेल्या चर्चेत संदीप शेलटकर, बाळा केळुसकर, बाबु धुरी, अंजली कोयंडे, सौ. पराडकर, प्राजक्ता शेलटकर, सौ. आचरेकर, विजय सारंग यांनी ग्रामस्थांची बाजू मांडताना, नळपाणी पुरवठा कर्मचारी मेघश्याम कवटकर यांनी पगार नियमितपणे मिळत नसल्याने राजीनामा दिलेला होता. बैठकीत त्यांना दर महिना पूर्ण झाल्यावर मासिक वेतन देण्याचे कबुल करण्यात आले होते. त्यानुसार कवटकर यांनी काम करण्यास तयारी दर्शविली होती. कवटकर यांचे पाच महिन्यांचे वेतन कोळंब ग्रामपंचायतीने न दिल्याने त्यांनी गणेशोत्सव काळात काम करण्याचे थांबविले. केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोळंबसाठी कोट्यवधी रुपये खर्च नळयोजनेसाठी करण्यात आला आहे. तरीही नळयोजनेला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कोळंब खालचावाडा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला गटाराचे पाणी तुंबल्याने दुर्गंधी तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याचे कळविले होते, मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कोळंब स्मशानभूमीतील शेड बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपये आमदार निधी उपलब्ध होऊनही स्मशानशेडचे काम झालेले नाही. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर आचारसंहिता लागल्यानंतर हा निधी प्राप्त होऊनही काही उपयोग होणार नाही. कोळंबचा विकास व नळपाणी पुरवठा करण्यास पदाधिकारी असमर्थ ठरत असल्याने आपली खुर्ची काम करणाऱ्यांकडे सोपवा, असेही ग्रामस्थांनी म्हटले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानंतर सरपंच सिया धुरी यांनी नळपाणी कामगाराचा पगार देण्यात आलेला नसल्याचे कबुल केले. पाणीपट्टी थकीत असल्याने नळपाणी योजना चालविण्यासाठी अडचणी येत आहेत. लाईट बील, नळपाणी दुरूस्ती आणि कामगार पगार हे शक्य होत नसल्याने कामगाराचा पगार रखडला आहे. तसेच कामगाराचे वयही जास्त असल्याने त्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आकृतीबंधमध्ये समाविष्ट करणे शक्य होत नाही. यामुळे आम्ही त्याचा पगार देण्यासाठी इतर व्यवस्था करणार आहोत. गणपती उत्सवाच्यावेळी त्याला पगार देण्यासाठी आम्ही चेक दिलेला होता, मात्र लाईटबीलापोटीही एक चेक देण्यात आल्याने त्यांच्या रक्कमेइतकी रक्कम खात्यात जमा नसल्याने त्यांना पगार देणे शक्य झालेले नाही. आता तात्काळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक लावून उपलब्ध असलेल्या इतर निधीतून त्या कामगाराचा पगार देण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच नविन कामगार घेऊन त्याच्याद्वारे सर्व ग्रामस्थांना पाणी पुरवठा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोळंब स्मशानशेडसाठी आरसीसी शेड होण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यासाठीच आपण आमदार निधीतून काम करण्याच्या प्रस्तावावर सही केलेली नव्हती, असेही सरपंच यांनी स्पष्ट केले.