सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर कोषाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती ; तळगाव सुपुत्राची फेरनिवड
महाराष्ट्र शासनाकडून एकूण १० जणांची निवड ; गोपाळ दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र शासनाकडून मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट वर कोषाध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सदस्यपदी मालवण तालुक्यातील तळगावचे सुपुत्र गोपाळ रघुनाथ दळवी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीवर २२ जानेवारी २०२१ रोजी कोषाध्यक्ष व सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. तर ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सदानंद शंकर सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तथापी व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्ष व कोषाध्यक्ष व सदस्यांची मुदत संपल्याने राज्य शासनाने याठिकाणी नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात कोषाध्यक्ष म्हणून पवन कुमार राम सत्यभामा दयाशंकर त्रिपाठी यांची निवड करण्यात आली असून सदस्य पदी श्रीमती मीना शेखर कांबळी, राहुल तुकाराम लोंडे, भास्कर रामा शेट्टी, महेश अशोक मुदलियार, गोपाळ रघुनाथ दळवी, जितेंद्र सहदेव राऊत, श्रीमती मनिषा अनिल तुपे, सुदर्शन अनंत सांगळे, भास्कर शंकर विचारे यांची नियुक्ती झाली आहे.