संतापजनक ! घटस्फोटीत नवऱ्याने जिवंत जाळलेल्या महिलेवर सोशल मीडियात अश्लील शेरेबाजी !

महिलांची पोलीस ठाण्यात तक्रार ; विकृत मनोवृत्तीच्या त्या व्यक्तींना तात्काळ अटक करण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर या महिलेवर तिच्या घटस्फोटीत नवऱ्याने पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे केवळ मालवणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या गुन्ह्यातील नराधम नवरा सुशांत गोवेकर याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या आरोपीवर कठोर कारवाई होऊन आगामी काळात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मालवण मधील महिलांनी एकत्र येत पोलिसांना निवेदन सादर केले. याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध होताच काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी सोशल मीडियावर मृत पूजावर अश्लील शेरेबाजी करून आरोपीच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात महिला पुन्हा एकदा आक्रमक बनल्या असून या आरोपींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, त्या दिवशी भयानक व हादरवणारी घटना घडली. एका महिलेला सुडभावनेतून जिवंत जाळलं गेलं. त्यामुळे मालवणमधील समस्त महिला पेटून उठल्या व मोर्चाने पोलीस स्टेशनवर जात आरोपीला कडक सजा व्हावी असं निवेदन दिलं. मालवण मधील ही अशी घटना अखेरचीच असावी हे महिलांचे निवेदन होतं. त्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिध्द झाली. तथापि सोशल मिडीयावरील त्या बातमीच्या खाली काही समाजकंटकानी खूप घाणेरड्या पद्धतीने मृत महिलेची अहवेलना होईल अशा पध्दतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाही नाही त्या तऱ्हेच्या घाणेरड्या कॉमेंट पोस्ट केल्या आहेत. या गोष्टी समाजाला घातक आहेत व अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीस वेसण घालणे गरजचे आहे. मृत महिलेची बदनामी करणाऱ्या या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी, असे निवेदन सादर करीत त्या व्यक्तींनी केलेल्या कॉमेंटच्या स्क्रीन शॉटच्या प्रिंट पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!