नौदल दिन कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून झालेला भ्रष्टाचार पूर्वनियोजितच !

ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांचा आरोप ; नौदलाने खर्च केल्यास भ्रष्टाचार करण्यास वाव मिळणार नाही, म्हणून नियोजन मधून मोठ्या प्रमाणात खर्च

मालवण : मालवण येथे झालेल्या नौदल दिनात जिल्हा नियोजन मधून मोठा भ्रष्टाचार झाला. नौदलाने या कार्यक्रमाची पूर्वकल्पना प्रशासनाला काही महिन्यापूर्वीच देऊन या कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था, नियोजन व सुशोभीकरण  करण्यासाठी नौदलाने आपल्याकडील निधी देण्याची ग्वाही दिली असताना त्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. मात्र कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यावर पालकमंत्री व प्रशासनाची पळापळ होऊन या कार्यक्रमासाठी आपले काहीतरी नियोजन दाखवायला हवे आणि नौदलाने खर्च केल्यास आपल्याला भ्रष्टाचार करण्यास मिळणार नाही या हेतूनेच जिल्हा नियोजन मधून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. मंडप घालण्यासाठी दोन कोटी, पोलिसांच्या बॅरिकेट्स साठी दीड कोटी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी सव्वा कोटी तर कार्यक्रमासाठी एसटी बस मधून माणसे आणण्यासाठी तब्बल सहा कोटी खर्च केल्याची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे, असा दावा ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी करत नौदल कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून झालेला भ्रष्टाचार हा पूर्वनियोजितच होता, असा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

नौदल दिन कार्यक्रमात जिल्हा नियोजन मधून खर्च होऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम. वैभव नाईक यांनी केल्यावर त्यावर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी टीका करत आमदारांवर आरोप केले होते. या आरोपांना ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी मंदार केणी म्हणाले, भाजपच्या धोंडी चिंदरकर यांनी आम. वैभव नाईक यांनी कणकवली येथील आपल्या घरामागील विद्युत लाईन बदलण्यासाठी जिल्हा नियोजन मधून खर्च केल्याचा आरोप केला. मात्र सदर विज वहिनी मुळे दोन्ही बाजूच्या जमिनी बाधित होत असल्याने ती वीज वहिनी बदलण्यासाठी आमदारां बरोबरच स्थानिक नागरिकांनीही वीज वितरण विभागाकडे मागणी केली होती याची माहिती चिंदरकर यांनी घ्यावी, चिंदरकर यांनी घेतलेली पत्रकार परिषद हि भाजपवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे घाईघाईत घेतलेली पत्रकार परिषद होती,  आमदारांनी जिल्हा नियोजन च्या निधीचा लाभ घेतल्याचा आरोप करणारे चिंदरकर एक प्रकारे स्वतःच्या पक्षावर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप मान्य करत असून आम्ही एवढे खाल्ले तर तुम्ही एवढे खाल्ले असेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला केणी यांनी लगावला. 

नौदल दिनासाठी जिल्हा नियोजन मधून करण्यात आलेल्या खर्चाची माहिती आपण घेतली आहे. यात अनेक गोष्टींवर अवाढव्य खर्च करण्यात आला. नौदल दिनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या निवासव्यवस्थेवर सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यावेळी अनेक पर्यटन व हॉटेल व्यवसायिकांनी पोलिसांसाठी निम्म्या दराने तर काहींनी मोफत रूम्स उपलब्ध करून मोठे सहकार्य केले होते. मग सव्वा कोटी रुपये खर्च झाले कुठे ? असा सवाल मंदार केणी यांनी यावेळी उपस्थित केला. 

भाजपचे बाबा मोंडकर हे आम. नाईक यांनी कुडाळ मालवण मध्ये विकास केला नाही, आमदारांना व्हिजन नाही, त्यांनी दहा वर्षात किती रोजगार उपलब्ध केला असे विचारत आहेत. मुळात बाबा मोंडकर ज्या पक्षात काम करत आहेत त्या पक्षातील आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी गेल्या २५- ३० वर्षात किती रोजगार जिल्ह्यात आणला, खासदार राहिलेल्या निलेश राणे यांनी किती रोजगार आणला ते सांगावे. तसेच व्हिजनच्या गोष्टी बाबा मोंडकर यांनी करूच नयेत, बाबा मोंडकर यांच्या सर्व व्हिजनची माहिती आमच्याकडे आहे. नौदल दिनावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवपुतळा उभारण्यासाठी जागा शोधताना बाबा मोंडकर हेच संबंधित जागा मालकाशी बोलणी करत होते. त्यावेळी बाबा मोंडकर यांनी त्या जागा मालकास असे काय सांगितले कि जागा मालकाने जागा देण्यास नकार दिला, मोंडकर यांनी जागा मालकासमोर कोणती अट ठेवली याची माहिती जनतेने घेतली पाहिजे. बंदर जेटी येथील स्टॉल धारकांना स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल धारकांकडून घेतलेल्या रक्कमेतही मोंडकर यांनी कमिशनचा भाग केला असा आरोप यावेळी केणी यांनी केला. मोंडकर यांनी आम. वैभव नाईक यांची तुलना करू नये, तुमच्या विकास कामावर बोला, तुमच्या भ्रष्टाचारामुळेच तुमची पातळी घटत चालली आहे, आम. नाईक हेच जिल्ह्याचे पुढील पालकांमंत्री असणार आहेत, असेही मंदार केणी म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!