प्रीती केळूसकर खून प्रकरण : सुशांत गोवेकरला पोलिसांनी केली अटक, उद्या न्यायालयात हजर करणार…

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती ; प्रीतीवर धुरीवाड्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मालवण, ता. २६ : शहरातील बसस्थानक समोरील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर उर्फ सौभाग्यश्वरी गोवेकर (वय- ३५, रा. धुरीवाडा) या विवाहितेवर पेट्रोल ओतून जाळल्या प्रकरणी तिचा घटस्फोटीत पती सुशांत सहदेव गोवेकर (वय-४०, रा. धुरीवाडा) याला आज सकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कुंभारमाठ येथून ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला असून सायंकाळी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. उद्या (शुक्रवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

दरम्यान मृत्यू झालेल्या प्रीती केळुसकर हिच्यावर आज दुपारी धुरीवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पूर्वश्रमीची प्रीती केळुसकर ही विवाहिता बसस्थानक येथील एका लॅबमध्ये काम करत होती. काल दुपारच्या सुमारास ती लॅबमध्ये काम करत असताना तिचा घटस्फोटीत पती सुशांत गोवेकर याने लॅबमध्ये जात तिच्या अंगावर प्लॅस्टिक बॉटल मधून आणलेले पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. आग लागल्याने प्रीती हि आरडाओरड करत लॅब बाहेर आली. हा प्रकार स्थानिक नागरिकांना दिसताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. यात प्रीती ही गंभीररीत्या भाजल्याने तिला रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. 

या घटनेनंतर सुशांत गोवेकर हा पसार झाला होता. मालवण पोलिसांचे व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाद्वारे त्याचा मालवण, कुडाळ, ओरोस, कणकवली परिसरात शोध घेण्यात आला. मात्र तो सापडून आला नाही. आज सकाळी पोलिसांना तो कुंभारमाठ परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्याला पकडत मालवण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली. यात दुसरे लग्न केल्याच्या रागातूनच त्याने हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, सौभायश्वरी गोवेकर या विवाहितेवर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने पेट्रोल ओतून जाळले. यात उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानुसार खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यासह अन्य कलमानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या सोबत अन्य कोणी होते का याचा तपास केला जात आहे. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले जाणार आहे. तिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूर येथील न्यायवैदिक पथकाद्वारे घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे असे स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!